आजाद समाज पार्टीची(ASP) मोठी घोषणा :- गावागावात ‘प्रतिसरपंच’ नेमणार!
Oplus_131072
——————
ग्रामपातळीवर संघटन मजबूत करण्याचा निर्धार; 1688 गावांपर्यंत पोहोचण्याचा पक्षाचा संकल्प
——————-
गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे वारंवार पुढे ढकलल्या जात असल्या, तरी आगामी काळात ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आजाद समाज पार्टीने गडचिरोली जिल्ह्यात ग्रामराजकारणाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा आक्रमक आणि संघटनात्मक निर्णय घेतला आहे.
पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी बैठकीत “गावागावात प्रतिसरपंच” ही अभिनव संघटनात्मक संकल्पना राबविण्याची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यातील 457 ग्रामपंचायती आणि 1,688 गावांमध्ये पक्षाचे संघटन उभे करून शेवटच्या गावातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी व्यक्त केला.
“गावात प्रश्न असतील तर प्रतिसरपंच तिथे पोहोचेल!”-
‘प्रतिसरपंच’ हा केवळ पक्षाचा पदाधिकारी नसून गावातील जनतेचा आवाज, प्रश्नांचा पाठपुरावा करणारा कार्यकर्ता आणि प्रशासनाला जाब विचारणारा स्थानिक प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे.
गावातील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगार, शासकीय योजना, ग्रामपंचायत कारभारातील अनियमितता तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची माहिती घेऊन ती प्रशासनासमोर मांडण्याची जबाबदारी प्रतिसरपंचांवर सोपविण्यात येणार आहे.
“सत्तेच्या राजकारणापेक्षा जनतेच्या प्रश्नांचे राजकारण गावागावात पोहोचवायचे आहे,” असा स्पष्ट संदेश या माध्यमातून आजाद समाज पार्टीने दिला आहे.
प्रस्थापित राजकारणाला नवे आव्हान-
आजाद समाज पार्टीने ग्रामपातळीवर संघटन उभारण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पारंपरिक राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन गावातील तरुणांना थेट संघटनात्मक जबाबदारी देण्याच्या या प्रयोगाकडे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राजकीय पाऊल म्हणून काँग्रेस – भाजप च्या प्रस्थापित राजकारणाला आव्हान ठरणार आहे.
संघटन मजबुतीसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना आदेश-
जिल्ह्यातील सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांना गावनिहाय प्रतिसरपंच नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः गावातील सक्रिय आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या तरुण-तरुणींनी प्रतिसरपंच पदासाठी पक्षाकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी केले.
दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर-
प्रतिसरपंचांची प्रभावी राजकीय व सामाजिक भूमिका विकसित करण्यासाठी पक्षाच्या वतीने लवकरच दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणात विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी विविध क्षेत्रातील अनुभवी व दिग्गज मार्गदर्शकांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
“प्रत्येक गावात संघटन, प्रत्येक प्रश्नावर आंदोलन!”
“गावपातळीवर सक्षम आणि संघर्षशील नेतृत्व निर्माण करणे, जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे आणि ग्रामविकासाला गती देणे हा *‘प्रतिसरपंच’* संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 1,688 गावांपर्यंत आजाद समाज पार्टीचे संघटन पोहोचवून जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष उभा केला जाईल. आगामी काळात गावागावातील जनता आणि तरुणाई हीच आमची खरी ताकद असेल,” असा विश्वास जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी व्यक्त केला.
बैठकीत पक्षप्रवेश; लवकरच नवीन जबाबदाऱ्या-
दरम्यान, बैठकीत काही नागरिकांनी आजाद समाज पार्टीमध्ये प्रवेश केला. आगामी काळात त्यांच्या क्षमतेनुसार संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
बैठकीला प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हा संघटक हंसराज उराडे, युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष चेतन काटेंगे, डॉ. प्रशांत सातार, महासचिव अंकुश कोकोडे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, महिला सचिव शोभा खोब्रागडे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रेम मडावी, धानोरा तालुकाध्यक्ष किशोर उसेंडी, कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिकराम, गडचिरोली महिला तालुकाध्यक्षा सविता बांबोळे, अश्विनी रायपुरे, हरीश वाकडे, नितीन दुर्गमवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
————–
