भाजपच्या १२ वर्षांच्या सत्तेत गडचिरोलीच्या विकासाचे ‘बारा वाजले’; टक्केवारीच्या राजकारणात सत्ताधारी व्यस्त — आ. विजय वडेट्टीवार.
Oplus_131072
कोठी–कोरनार पूल तीन वर्षांत वाहून गेला, आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर; गर्भवतीला पुरातून खाटेवर नेण्याची वेळ म्हणजे विकासाच्या दाव्यांची पोलखोल
गडचिरोली |
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या बारा वर्षांपासून भाजपची सत्ता असतानाही विकासाच्या नावाखाली केवळ घोषणा आणि उद्घाटनांचे राजकारण सुरू असून, प्रत्यक्षात जिल्ह्याच्या विकासाचे ‘बारा वाजले आहेत’, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केली.
शुक्रवारी (दि. २८) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सत्ताधारी मोठमोठी कंत्राटे ‘मॅनेज’ करण्यात आणि टक्केवारीच्या राजकारणात व्यस्त असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
उद्घाटनाच्या तीन वर्षांतच पूल वाहून जाणे म्हणजे गुणवत्तेचा बोजवारा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला कोठी–कोरनार पूल अवघ्या तीन वर्षांत वाहून गेला, याकडे लक्ष वेधत वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या कामांच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“करोडो रुपये खर्च करून बांधलेली कामे काही वर्षांतच वाहून जात असतील, तर कामांच्या गुणवत्तेची जबाबदारी कोणाची?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याऐवजी सत्ताधारी केवळ राजकारण करण्यात व्यस्त असल्याची टीकाही त्यांनी केली.
गडचिरोलीची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवरही वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकारी तसेच प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना दर्जेदार उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“मुख्यमंत्री हेच गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. त्यांनी एक दिवस गडचिरोलीत येऊन प्रत्यक्ष आरोग्य व्यवस्था पाहावी आणि ती सुधारण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा,” असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.
जपतलाईतील विद्यार्थिनींच्या मृत्यूचा मुद्दा ऐरणीवर
अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. जपतलाईपर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता नाही आणि जवळच्या आरोग्य केंद्रात आवश्यक औषधे उपलब्ध नसतील, तर ही केवळ प्रशासकीय त्रुटी नसून व्यवस्थेचे अपयश असल्याचे त्यांनी म्हटले.
अनुदानित आणि सरकारी आश्रमशाळांना मिळणाऱ्या अनुदानात मोठी तफावत असल्याचा मुद्दा उपस्थित करून दोन्ही प्रकारच्या आश्रमशाळांना समान अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेसाठी २५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केल्यास या क्षेत्रात मोठा बदल घडवून आणता येईल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
कोईंदूळच्या गर्भवती महिलेवरून सरकारला घेरले
एटापल्ली तालुक्यातील कोईंदूळ येथे गर्भवती महिलेला नाल्याच्या पुरातून खाटेवरून जीवघेणा प्रवास करावा लागल्याच्या घटनेवरूनही वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
“रक्षाबंधण हा बहिण-भावाच्या प्रेमाचा आणि सुरक्षेचा पवित्र सण. भाऊ बहिणीच्या सुरक्षेची हमी देतो. पण याच दिवशी एका गर्भवती भगिनीला पुरातून खाटेवरून जीव मुठीत घेऊन जावे लागत असेल, तर सत्ताधाऱ्यांनी आपण या बहिणींना नेमके काय दिले, याचा आत्मपरीक्षण करावे,” असा टोला त्यांनी लगावला.
“गर्भवती महिलेला उपचारासाठी पुरातून जावे लागणे ही गडचिरोलीच्या विकासाची नव्हे, तर सरकारी व्यवस्थेच्या अपयशाची कहाणी आहे,” असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना संवेदनशीलतेचा धडा दिला.
‘विकास’ कागदावर, वास्तव मात्र रस्त्यावर
पूल वाहून जात आहेत, रस्ते खराब आहेत, आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत आहेत आणि आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत गडचिरोलीच्या विकासाचे मोठमोठे दावे करण्यापेक्षा सरकारने जमिनीवरील वास्तव पाहावे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली.
पत्रकार परिषदेला आ. रामदास मसराम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, माजी नगराध्यक्ष राम मेश्राम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, नगरसेवक सतीश विधाते, माधवराव गावड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
