विकासकामांबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; खासदार डॉ. नामदेव किरसान यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे विशेष उपस्थिती
Oplus_131072
कोठी–कोरणार पूल प्रकरणासह जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांवर खासदार किरसान आक्रमक
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक; दोषींवर कठोर कारवाईसह रस्ते-पुलांसाठी तातडीने निधी देण्याची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्प, प्रलंबित रस्ते व पुलांची कामे तसेच नागरिकांच्या महत्त्वाच्या समस्यांबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस गडचिरोली–चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विशेष उपस्थिती दर्शवत जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या प्रश्नांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले.
बैठकीत एटापल्ली तालुक्यातील कोठी–कोरणार येथे अवघ्या तीन वर्षांत कोसळलेल्या पुलाचा मुद्दा खासदार डॉ. किरसान यांनी प्रमुख्याने उपस्थित केला. पुलाच्या बांधकामाची सखोल चौकशी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारासह संबंधित सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण संपवू नये, तर दोषी आढळणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
लोकप्रतिनिधी हे जनतेच्या समस्या व स्थानिक गरजा लक्षात घेऊन विकासकामांची शिफारस करीत असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या अत्यावश्यक कामांना प्राधान्य देऊन त्यांना तातडीने प्रशासकीय मंजुरी तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही खासदार किरसान यांनी केली.
पाच महत्त्वाच्या पुलांच्या मागणीकडे वेधले लक्ष
कुंभी–चांदाळा व रानमूल–माडेमुल : पोटफोडी नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो. गडचिरोली शहरापासून अवघ्या ८ ते १० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावांसाठी पुलाचे काम तातडीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.
मंगेवाडा–मंगेवाडा टोला, येरमागड : मोठ्या नाल्यावर पूल नसल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुलाच्या मागणीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांनी नुकतेच पाण्यात उभे राहून आंदोलन केले होते. त्यामुळे या पुलाचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी खासदारांनी केली.
सावंगा–मंगेवाडा मार्ग : छत्तीसगड सीमेला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून बांडिया नदीला पावसाळ्यात पूर आल्याने वाहतूक व संपर्क ठप्प होतो. त्यामुळे येथे पुलाचे बांधकाम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
सालेभट्टी–चिचोली–धानोरा मार्ग : कठाणी नदीवर पूल नसल्यामुळे अवघ्या ५ किलोमीटरचे अंतर नागरिक व विद्यार्थ्यांना तब्बल २५ किलोमीटरचा वळसा घालून पार करावे लागते. त्यामुळे या ठिकाणी पूल उभारण्याची मागणी करण्यात आली.
मीचगाव बुजुर्ग–फासिटोला : कठाणी नदीवर पूल उभारून हा मार्ग दूधमाळा राष्ट्रीय महामार्गाशी जोडल्यास परिसरातील सुमारे २० ते २५ गावांना गडचिरोलीशी थेट संपर्क मिळू शकतो. त्यामुळे या पुलाच्या कामाला प्राधान्य देण्याची मागणी खासदार डॉ. किरसान यांनी केली.
याशिवाय जिल्ह्यातील इतर महत्त्वाचे रस्ते, पूल, पुलिया आणि प्रलंबित विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची मागणीही खासदारांनी केली.
या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, आमदार रामदास मसराम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, पोलीस अधीक्षक एम. रमेश, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
