चामोर्शीत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे भाजपकडून जल्लोषात स्वागत; विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा.
Oplus_131072
चामोर्शी | २७ ऑगस्ट : महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे चामोर्शी शहरात प्रथम आगमन झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देत मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.
भाजप तालुकाध्यक्षा रोशनीताई स्वप्निल वरघंटे यांच्या नेतृत्वाखाली हा स्वागत कार्यक्रम पार पडला. दौरा व्यस्त असतानाही मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाला प्रतिसाद देत आपला ताफा थांबविला. त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला. मंत्र्यांनी कार्यकर्त्यांशी आस्थेने संवाद साधल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा
गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित अनेक कामे प्रलंबित असून, या कामांना गती मिळावी, अशी अपेक्षा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण, चामोर्शी तालुक्यातील पायाभूत सुविधांचा विकास तसेच जिल्ह्यातील रस्ते व अन्य बांधकाम प्रकल्पांचा दर्जा उंचावण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
मंत्र्यांच्या चामोर्शी दौऱ्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित स्थानिक प्रश्नांना चालना मिळून प्रलंबित कामे मार्गी लागतील, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे,तालुकाध्यक्षा रोशनी स्वप्निल वरघंटे, जिल्हा सचिव दिलीप चलाख, किसान मोर्चा जिल्हा महामंत्री साईनाथ बुरांडे, ज्येष्ठ नेते माणिक कोहळे, श्रावण पाटील सोनटक्के, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष कविताताई किरमे, तालुका महामंत्री वासुदेव चिचघरे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नीरज रामानुजमवार, माजी शहराध्यक्ष सोपान नैताम, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यश गण्यारपवार, ज्येष्ठ नेते रमेश नैताम, रामचंद्र वरवाडे, पंकज पेशटीवार, विनोद किरमे, मनिषा बोधनवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
