चोरीला गेलेले १५ मोबाईल पोलिसांनी हस्तगत करून मूळ मालकांना केले परत – चामोर्शी पोलिसांची उत्तम कामगिरी.
चामोर्शी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; CEIR पोर्टलच्या मदतीने २ लाख ५४ हजार रुपयांचे मोबाईल शोधले
चामोर्शी, दि. २६ ऑगस्ट : चामोर्शी शहर व परिसरातून चोरीला गेलेले तसेच हरवलेले तब्बल १५ महागडे अँड्रॉईड मोबाईल फोन चामोर्शी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हस्तगत करून त्यांच्या मूळ मालकांना परत केले. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे २ लाख ५४ हजार रुपये असून, पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांत चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवासादरम्यान, बाजारपेठेत तसेच शेतात काम करताना मोबाईल हरवणे व चोरी होण्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या.
या तक्रारींची गंभीर दखल घेत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी हरवलेल्या व चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गडचिरोली उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या सल्ल्यानुसार चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली.
या पथकात पोलीस अंमलदार भावेश वरगंटीवार व हर्षाली सहारे यांचा समावेश होता. पथकाने हरवलेल्या मोबाईलचे IMEI क्रमांक CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर नोंदवून तांत्रिक पद्धतीने त्यांचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विविध ठिकाणी वापरात असलेले १५ मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.
त्यानंतर बुधवार, २६ ऑगस्ट रोजी चामोर्शी पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या हस्ते सर्व १५ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. अनेक दिवसांपासून हरवलेला मोबाईल पुन्हा हातात मिळाल्याने तक्रारदारांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला. नागरिकांनी चामोर्शी पोलिसांचे आभार मानत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
मोबाईल हरवल्यास तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन
मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला असल्यास नागरिकांनी विलंब न करता जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच CEIR पोर्टलवरही मोबाईलची माहिती नोंदवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी केले.
चोरीला गेलेले व हरवलेले मोबाईल शोधून ते नागरिकांना परत करण्याच्या चामोर्शी पोलिसांच्या या तत्पर आणि तांत्रिकदृष्ट्या प्रभावी कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
