भेंडाळा येथील आंगणवाडी मध्ये निघाला नाग ,चिमुकल्याचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर पालकांमध्ये भीतीचे वातावरण.
Oplus_131072
चामोर्शी, दि. २५ ऑगस्ट २०२६ : चामोर्शी तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दहेगाव येथील अंगणवाडीत साप आढळल्याची घटना ताजी असतानाच, भेंडाळा येथील अंगणवाडी केंद्रात चक्क नाग आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अंगणवाडीतील चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लहान बालकांच्या संगोपनासह पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी असलेली अंगणवाडी सुरक्षित आणि स्वच्छ असणे अपेक्षित आहे. मात्र, परिसरात वाढलेली झाडाझुडपे, कचरा आणि अस्वच्छतेमुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांच्या नियमित स्वच्छता व सुरक्षिततेबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी दहेगाव अंगणवाडीत साप आढळल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता भेंडाळा अंगणवाडीत नाग आढळल्याने संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुर्घटना घडली नसली, तरी भविष्यात एखाद्या चिमुकल्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
अंगणवाडी परिसराची तातडीने स्वच्छता करून झाडाझुडपे व कचरा हटवावा, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
चिमुकल्यांच्या सुरक्षेशी संबंधित बाब असल्याने प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
