प्रगत काष्ठ प्रक्रिया केंद्रामुळे महिलांच्या आत्मनिर्भरतेला नवी दिशा.-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा.
आलापल्ली येथे १.५९ कोटींच्या अत्याधुनिक केंद्राचे लोकार्पण; सागवानाच्या मूल्यवर्धनासह रोजगारनिर्मितीला चालना
आलापल्ली/गडचिरोली, दि. २५ : गडचिरोलीच्या समृद्ध वनसंपदेचा स्थानिक पातळीवर योग्य वापर करून काष्ठ उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने आलापल्ली येथे ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र’ उभारण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजना २०२४-२५ अंतर्गत सुमारे १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारलेल्या या केंद्राचे लोकार्पण जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आले.
या केंद्रामुळे गडचिरोलीतील सागवानावर स्थानिक पातळीवर आधुनिक पद्धतीने प्रक्रिया करून फर्निचर व विविध काष्ठ उत्पादने तयार करण्यास चालना मिळणार आहे. त्याचबरोबर स्थानिक युवक आणि विशेषतः महिलांना काष्ठकाम व फर्निचर निर्मितीचे प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, गडचिरोलीला विपुल वनसंपदा आणि दर्जेदार सागवान लाभले आहे. मात्र, कच्च्या वनसंपदेवर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन झाल्यास रोजगारनिर्मितीसोबत स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळू शकते. आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून या केंद्रातून महिलांसह युवकांसाठी रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होतील.
पुरुषप्रधान क्षेत्रात महिलांची दमदार पावले
कारपेंटरी आणि काष्ठ प्रक्रिया क्षेत्र पुरुषप्रधान मानले जात असले, तरी या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी प्रत्यक्ष फर्निचर व काष्ठ उत्पादने तयार करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. टेबल, ट्रे यासह विविध वस्तू तयार करणाऱ्या महिलांच्या कौशल्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.
प्रशिक्षणापुरता उपक्रम मर्यादित न ठेवता प्रशिक्षित महिलांना नियमित रोजगार, स्वयंरोजगार, उत्पादननिर्मितीसाठी आवश्यक सहकार्य आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
गडचिरोलीच्या सागवानाला स्थानिक मूल्यवर्धनाची जोड
गडचिरोलीच्या सागवानाला देशातील विविध महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये मागणी आहे. आता आलापल्लीतील या केंद्राच्या माध्यमातून सागवानावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून दर्जेदार फर्निचर व इतर काष्ठ उत्पादने तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे वनसंपदेपासून उत्पादन आणि उत्पादनापासून रोजगार अशी स्थानिक अर्थव्यवस्थेची साखळी मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

प्रशिक्षणापासून बाजारपेठेपर्यंत साखळी उभारणार
केंद्राच्या दीर्घकालीन यशासाठी प्रशिक्षण–उत्पादन–बाजारपेठ–उत्पन्न अशी सक्षम साखळी निर्माण करण्याचे नियोजन आहे. केंद्रात तयार होणारे फर्निचर आश्रमशाळा, शासकीय कार्यालये आणि विविध संस्थांच्या गरजांशी जोडण्यासोबतच नागपूर विभागातील बाजारपेठेत पोहोचविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
प्रशिक्षित महिला कारपेंटरचा गौरव
केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष काष्ठ उत्पादने तयार करणाऱ्या मुक्ताबाई भुपेलीवार, कविता मुळकरी, संध्या ठाकरे, राजलक्ष्मी पोपेली आणि लक्ष्मी पेदी यांचा जिल्हाधिकारी पंडा यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर यांनी केंद्राची माहिती दिली. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून मिळालेल्या निधीतून आधुनिक यंत्रसामग्री, शेड आणि प्रशिक्षणाच्या सुविधा उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
लोकार्पणानंतर जिल्हाधिकारी पंडा व उपस्थित मान्यवरांनी केंद्रातील अत्याधुनिक यंत्रसामग्रीची पाहणी केली. महिलांनी तयार केलेल्या काष्ठ उत्पादनांची माहिती घेत त्यांच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक दिव्याभारती, उपवनसंरक्षक शैलेश मीना, सहायक जिल्हाधिकारी अजय डोके, उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ, तहसीलदार बालाजी सोमवंशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी रमेश पेरगू, संशोधन अधिकारी हटवार यांच्यासह वन विभाग, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
