दहेगाव अंगणवाडीत रोज मन्यारचा वावर; चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

0
IMG-20260825-WA0120
Spread the love

पालकांमध्ये भीतीचे वातावरण; गवत-झुडपे व अस्वच्छतेमुळे धोका वाढला, तातडीच्या उपाययोजनांची मागणी

गडचिरोली/चामोर्शी, दि. २४ ऑगस्ट २०२६ : चामोर्शी तालुक्यातील दहेगाव येथील अंगणवाडी परिसरात रोज सकाळी मन्यार साप आढळत असल्याचा दावा ग्रामस्थ व पालकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अंगणवाडी परिसरात वाढलेले गवत-झुडपे, कचरा आणि इमारतीची झालेली दुरवस्था यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. लहान मुलांना सापाचा धोका ओळखता येत नसल्याने एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

स्वच्छता आणि दुरुस्तीची गरज

अंगणवाडी परिसरातील गवत व झुडपे तातडीने हटविणे, परिसराची स्वच्छता करणे, इमारतीतील भगदाडे बुजविणे तसेच फुटलेल्या स्लाईलची दुरुस्ती करण्याची मागणी पालकांनी केली आहे. साप किंवा अन्य विषारी सरपटणारे प्राणी इमारतीत प्रवेश करू नयेत, यासाठीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

नगरपंचायतीकडून सफाईचे आश्वासन

याबाबत चामोर्शी नगरपंचायतीचे स्वप्निल पिदुरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दहेगाव येथील अंगणवाडी नगरपंचायतीच्या अखत्यारित नसून बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित येते. मात्र, या समस्येची माहिती मिळाल्यानंतर सफाई कर्मचारी पाठवून परिसरातील कचरा साफ करण्यासह फुटलेल्या स्लाईलची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

‘दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?’

“रोज साप येत असल्याचे सांगितले जात असताना मुलांना अंगणवाडीत पाठवायचे तरी कसे?” असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. महिला व बाल विकास विभाग आणि संबंधित प्रशासनाने अंगणवाडीची तातडीने पाहणी करून धोकादायक परिस्थिती दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने केवळ तात्पुरती स्वच्छता न करता अंगणवाडी परिसराची नियमित देखभाल आणि साप प्रतिबंधक उपाययोजना कायमस्वरूपी करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!