चामोर्शी माता-बाळ मृत्यू प्रकरणी दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.

0
IMG-20260824-WA0185
Spread the love

आजाद समाज पक्षाचे जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन; तातडीने चौकशी करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी

चामोर्शी, दि. २४ ऑगस्ट २०२६ : चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील कथित हलगर्जीपणामुळे माता व बाळाचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी वैद्यकीय अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आजाद समाज पक्षाने(ASP) केली आहे. यासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांना निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, संबंधित रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे रुग्णावर वेळेत उपचार होण्यास विलंब झाला. तसेच रुग्णाची प्रकृती सुरुवातीला सामान्य होती आणि प्रसूतीची निर्धारित वेळ पूर्ण झाली होती, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रसूतीदरम्यान सिझेरियनची आवश्यकता निर्माण झाल्यास रुग्णाला तातडीने इतरत्र संदर्भित करण्याची पद्धत असल्याचा आरोपही पक्षाने केला आहे.

याशिवाय, रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध असतानाही आठवड्यात केवळ एका दिवशी सोनोग्राफी केली जाते आणि इतर दिवशी रुग्णांना संबंधित डॉक्टरांच्या खासगी क्लिनिकमध्ये सोनोग्राफीसाठी पाठविले जाते, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

माता-बाळ मृत्यूचे नेमके कारण, उपचारात विलंब झाला का आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी काय होती, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आजाद समाज पक्षाने (ASP)केली.

तसेच, या घटनेमुळे पीडित कुटुंबावर आलेल्या आर्थिक व मानसिक संकटाची दखल घेऊन त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

या प्रकरणाची चौकशी करून सत्य समोर आणण्यासोबतच ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, डॉक्टरांची उपस्थिती आणि सोनोग्राफीसारख्या आवश्यक सुविधांचे नियोजन याबाबत प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!