चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील कथित हलगर्जीपणामुळे माता-बाळाचा मृत्यू; दोषींवर कठोर कारवाईची आजाद समाज पार्टीची मागणी.

0
IMG-20260824-WA0184
Spread the love

आरोग्य प्रशासनाची असुविधा पुन्हा चव्हाट्यावर!

 

चामोर्शी, दि. 24 ऑगस्ट 2026 : चामोर्शी येथील शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि प्रशासनाचा कथित बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या जिजा हंसराज सातार (वय 27) या महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीने केली आहे.

दि. 23 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे 5 वाजता जिजा सातार यांना प्रसूतीसाठी चामोर्शी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रसूतीची पूर्ण वेळ झालेली असतानाही दाखल केल्यानंतर जवळपास तीन तास योग्य उपचार मिळाले नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पीडित महिलेच्या पतीने आजाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला शासनाकडून योग्य नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवावा, अशी मागणी करण्यात आली.

रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह-

पतीच्या तक्रारीनुसार, रुग्णालय प्रशासनाच्या कथित हलगर्जीपणामुळे माता आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सकाळी 5 वाजता रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही सुमारे 11 वाजेपर्यंत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किलनाके उपस्थित नव्हते, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

परिस्थिती गंभीर झाल्यानंतर नर्सने वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून बोलावले. त्यानंतर रुग्णाला पुढील उपचारासाठी रेफर करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, रेफर करण्यात झालेल्या कथित विलंबामुळे बाळाचा रस्त्यातच मृत्यू झाला, तर मातेला गडचिरोली महिला रुग्णालयात वेळेत आवश्यक उपचार न मिळाल्याने तिचाही मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप आजाद समाज पार्टीने केला आहे.

वेळेत सीझेरियन झाले असते तर परिस्थिती टाळता आली असती का?”

गरज असताना वेळेत सीझेरियन करण्यात आले असते तर माता व बाळाचे प्राण वाचू शकले असते का? याची वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी करण्याची मागणी आजाद समाज पार्टीने केली आहे.

*शासकीय रुग्णालयातील सोनोग्राफी व्यवस्थेवरही आरोप-*

चामोर्शी रुग्णालयातील सोनोग्राफी सुविधेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. डॉ. देवरे हे शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आपल्या खासगी क्लिनिकमध्ये सोनोग्राफीसाठी बोलावत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. तसेच शासकीय रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा केवळ आठवड्यात एका दिवसापुरतीच उपलब्ध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्याकडे आजाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली असता, संबंधित खासगी क्लिनिकच्या प्रकरणाची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पक्षाने सांगितले.

आरोग्य यंत्रणेतील त्रुटींवर पांघरूण घालू देणार नाही”

माता आणि बाळाच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत गंभीर असून, केवळ चौकशीचे आश्वासन देऊन हा विषय दडपण्याचा प्रयत्न झाल्यास आजाद समाज पार्टी शांत बसणार नाही. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, संबंधित वैद्यकीय अधीक्षक डॉ. किलनाके तसेच डॉ. देवरे यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करून दोष सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला शासनाकडून योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ASP पक्षाने केली आहे.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!