जिल्ह्यातील फुटबॉलला राज्य सरकारने प्राधान्य द्यावे; गावागावातील क्रीडांगणांची सुविधा सुधारण्याची मागणी-डॉ.खुणे.
Oplus_131072
घोट, दि. २४ ऑगस्ट २०२६ : घोटजवळील शामनगर येथे स्वामी विवेकानंद क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष विलास उईके होते. यावेळी मुख्याध्यापक केंद्रे सर, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, महेश विश्वास, किशोर कुंडू, महामंत्री पलाश घरामी, वनकर गुरुजी, मंडल गुरुजी, कृष्णकांत विश्वास, विलास वडेट्टीवार, निरंजन ढाली, उत्तम मंडल यांच्यासह गावातील नागरिक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रणय खुणे यांनी गडचिरोली जिल्ह्यात फुटबॉल खेळाला मोठी लोकप्रियता असून ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे. मात्र, आवश्यक क्रीडासुविधा आणि मैदानांच्या अभावामुळे या खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे सांगितले.
राज्य सरकारने जिल्ह्यातील फुटबॉल खेळाला प्राधान्य देऊन गावागावातील क्रीडांगणांची योग्य व्यवस्था करावी. तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर नियमित फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली. ही मागणी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या माध्यमातून शासनदरबारी लावून धरणार असल्याचेही डॉ. खुणे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात विलास उईके, कृष्णकांत मंडल आणि रमेश अधिकारी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन माजी सरपंच सजल विश्वास यांनी केले, तर आभार उपसरपंच समीरन रॉय यांनी मानले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्वामी विवेकानंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दिंपकर हलदार, उपाध्यक्ष राहुल मंडल आणि संचालक महेंद्र मंडल यांनी परिश्रम घेतले.

