यशोधरा विद्यालयात किशोरवयीन आरोग्य जनजागृती; विद्यार्थ्यांना आरोग्य, पोषण व पॉक्सो कायद्याचे मार्गदर्शन
Oplus_131072
चामोर्शी : राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय चामोर्शीच्या वतीने यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी सवयी रुजविणे, मानसिक व शारीरिक बदलांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि सामाजिक समस्यांबाबत माहिती देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रविणकुमार किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्याम रामटेके होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक पुरुषोत्तम घ्यार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विज्ञान शिक्षक राजू धोंडरे, सहाय्यक शिक्षिका घोंगडे, दुधबळे, सातपुते यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना किशोरवयात होणारे शारीरिक, भावनिक व मानसिक बदल, संतुलित आहाराचे महत्त्व, नियमित व्यायाम, प्राणायाम, व्यसनांचे दुष्परिणाम, प्रजनन व लैंगिक आरोग्य, एचआयव्ही-एड्सचा प्रसार व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यासोबतच किशोरवयीन गर्भधारणेचे दुष्परिणाम, लैंगिक हिंसाचार, बालकांच्या संरक्षणासाठी असलेला पॉक्सो कायदा आणि मानसिक तणावावर मात करण्यासाठी आवश्यक उपाय याविषयीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शिक्षक राजू धोंडरे यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी तृप्ती मेश्राम यांनी केले, तर निलेश क्षीरसागर, प्रवीण नैताम, अमोल उंदीरवाडे, लक्ष्मण गव्हारे, बोरुले, चंद्रगडे आणि आशा उंदीरवाडे यांनी सहकार्य केले. आभार प्रदर्शन घोंगडे यांनी मानले.
