पावसाच्या सरींत टिपागडवर स्वच्छतेची हाक; आमदार डॉ. मिलिंद नरोटेंसह युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
Oplus_131072
टिपागडच्या निसर्गसौंदर्याला कचऱ्याचा विळखा; युवकांनी राबविले स्वच्छता अभियान

गडचिरोली, दि. २३ ऑगस्ट : जिल्ह्यातील प्रसिद्ध निसर्ग पर्यटनस्थळ असलेल्या टिपागड परिसरात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर लक्ष वेधत भाजयुमो आणि सोबे टुरिझम (ट्रायबी टूर्स) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमात सुमारे दीडशे युवक, भाजयुमोचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि निसर्गप्रेमी नागरिक सहभागी झाले.
टिपागडच्या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, पर्यटनानंतर प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खाद्यपदार्थांचे अवशेष आणि अन्य कचरा परिसरातच टाकला जात असल्याने निसर्गसौंदर्याला गालबोट लागत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘निसर्गाचा आनंद घ्या; मात्र निसर्ग अस्वच्छ करू नका’ हा संदेश देण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले.
रिमझिम पावसाची पर्वा न करता आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह सहभागी युवक बाईकने टिपागडच्या पायथ्याशी पोहोचले. त्यानंतर पायी डोंगर चढून परिसराची पाहणी करण्यात आली. विविध ठिकाणी विखुरलेला प्लास्टिक कचरा, बाटल्या, खाद्यपदार्थांचे अवशेष आणि इतर घाण गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
अभियानादरम्यान जमा झालेल्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत टिपागडचे निसर्गसौंदर्य अबाधित ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. स्वच्छता अभियानानंतर सहभागी युवकांनी निसर्गरम्य वातावरणात नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या भोजनाचा आस्वाद घेतला.
मूतनुरच्या पहाडानंतर आता टिपागडवरही स्वच्छतेचा संदेश देण्यात आला असून, पर्यटनस्थळांचे संवर्धन केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
‘कचरा आणा, कचरा परत घेऊन जा’
टिपागडसह जिल्ह्यातील सर्व निसर्ग पर्यटनस्थळे स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी पर्यटकांनी जबाबदारीने वागावे. ‘कचरा स्वतःसोबत आणा आणि स्वतःसोबत परत घेऊन जा,’ असे आवाहन यावेळी करण्यात आले.
युवकांनी घेतलेला हा पुढाकार केवळ एकदिवसीय स्वच्छता अभियान न राहता टिपागडच्या निसर्गसंवर्धनासाठी कायमस्वरूपी चळवळ ठरावी, अशी अपेक्षा निसर्गप्रेमींनी व्यक्त केली.

