आठ दशके स्वातंत्र्याची; तरी मुरेवाडा अंधारातच! ना वीज, ना पक्का रस्ता—विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह?.
Oplus_131072
स्वातंत्र्याची आठ दशके उलटली; मुरेवाडा अजूनही अंधारात!
ना वीज, ना पक्का रस्ता, ना मूलभूत सुविधा; गर्देवाडा ग्रामपंचायतीतील ११ गावांचा विकास कागदावरच?
गर्देवाडा/एटापल्ली : देशाला स्वातंत्र्य मिळून आठ दशके उलटली, शहरांपासून दुर्गम भागापर्यंत विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी गडचिरोली जिल्ह्यातील मुरेवाडा गावाच्या नशिबी आजही अंधार आणि हालअपेष्टाच असल्याचे चित्र आहे. वीज नाही, पक्का रस्ता नाही आणि मूलभूत सुविधांचीही वानवा असल्याने ग्रामस्थांचे जीवन अक्षरशः संघर्षमय झाले आहे.
गर्देवाड्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेले मुरेवाडा गाव छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर आहे. मात्र या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पावसाळ्यात चिखल आणि खड्डे, तर उन्हाळ्यात धुळीचा सामना करीत ग्रामस्थांना प्रवास करावा लागतो. रुग्ण, गर्भवती महिला, विद्यार्थी आणि वृद्धांसाठी हा प्रवास अधिकच त्रासदायक ठरत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचणार कशी? हा प्रश्नही गंभीर बनला आहे.
११ गावांचा दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर
गर्देवाडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत गर्देवाडा, मुरेवाडा, नैतला, कोइनवर्षी, हाजबोडी, रेखलमेठा, ताडगुडा, देवपाडी, रेखाबाताळ, हीकेर आणि मर्धाकुही अशी एकूण ११ गावे येतात. त्यामुळे मुरेवाडा ते छत्तीसगड मार्गाची दुरवस्था ही केवळ एका गावाची समस्या नसून संपूर्ण परिसराच्या विकासाला अडथळा ठरणारा गंभीर प्रश्न आहे.
शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ, रोजगार आणि दैनंदिन गरजांसाठी या गावांतील नागरिकांना दळणवळणाच्या याच मार्गावर अवलंबून राहावे लागते. मात्र रस्त्याची अवस्था पाहता विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष वास्तव यातील दरी स्पष्टपणे दिसून येते.
‘हर घर बिजली’च्या घोषणांमध्ये मुरेवाडा मात्र अंधारात!
देशभर वीजपुरवठ्याच्या विविध योजना राबविल्या जात असताना मुरेवाडा गावातील नागरिकांना आजही विजेची प्रतीक्षा करावी लागत असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विजेअभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून मोबाईल चार्जिंगपासून संपर्क व्यवस्थेपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आठ दशकांनंतरही गावातील अंधार दूर होत नसेल, तर विकास नेमका कोणासाठी? असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रस्ताव कुठे अडकले? प्रशासनाने उत्तर द्यावे
मुरेवाड्यात वीज पोहोचविण्यासाठी आतापर्यंत कोणते प्रस्ताव तयार करण्यात आले? पक्का रस्ता बांधण्यासाठी निधी मंजूर झाला आहे का? मंजूर झाला असेल तर काम रखडले का? आणि प्रस्तावच नसेल तर संबंधित विभागाने आतापर्यंत कार्यवाही का केली नाही? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेसमोर ठेवणे गरजेचे आहे.
लोकप्रतिनिधींनी एक रात्र मुरेवाड्यात मुक्काम करावा!
निवडणुकीच्या काळात दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रतिनिधी त्यांच्या समस्या प्रत्यक्ष किती गांभीर्याने समजून घेतात, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. वीज नसलेल्या आणि खराब रस्त्यामुळे त्रस्त असलेल्या मुरेवाड्यात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी एक रात्र मुक्काम करून ग्रामस्थांच्या अडचणी प्रत्यक्ष अनुभवाव्यात, अशी मागणी आता पुढे येत आहे.
मुरेवाड्याचा विकास आराखडा कधी?
जिल्हा प्रशासनाने मुरेवाड्यासह गर्देवाडा ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व ११ गावांचे तातडीने सर्वेक्षण करून वीज, रस्ता, आरोग्य, शिक्षण आणि दळणवळणासाठी कालबद्ध विशेष विकास आराखडा तयार करावा. तसेच मुरेवाडा ते छत्तीसगड जोडणाऱ्या मुख्य मार्गाच्या पक्क्या बांधकामाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
विकासाच्या नकाशावर मुरेवाड्याचे नाव कधी येणार आणि स्वातंत्र्याच्या आठ दशकांनंतरही सुरू असलेला हा ‘विकासाचा वनवास’ कधी संपणार? याचे उत्तर आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
