पर्यायी पुलियावरून जीव मुठीत धरून वाहतूक; नवीन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत तातडीने डागडुजीची मागणी.
पोहर नदीवरील जुन्या पुलियाची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष किती दिवस?
मोठमोठे खड्डे, भेगा आणि वाहतुकीचा खोळंबा; नवीन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत तातडीने डागडुजीची स्थानिकांची मागणी
चामोर्शी : चामोर्शी मार्गावरील पोहर नदीच्या पुलाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू असल्याने वाहतुकीसाठी जुन्या लहान पुलियाचा वापर केला जात आहे. मात्र, आधीच अरुंद असलेल्या या पर्यायी पुलियाचीही अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे आणि भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहतूक करावी लागत आहे.
या पुलियावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असताना खड्ड्यांमुळे अनेकदा वाहने अडकत असून वाहतुकीचा खोळंबा निर्माण होत आहे. विशेषतः मोठी वाहने, ट्रक, बस तसेच दुचाकीस्वारांना या मार्गावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच गंभीर अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे.
नवीन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्ग सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना जुन्या पुलियाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष का? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाने तातडीने पाहणी करून पुलियावरील मोठमोठे खड्डे खडी-मुरूम अथवा चुरीने भरून रस्ता वाहतुकीस योग्य करावा, तसेच धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
नवीन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत तरी जुन्या पुलियावरील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत; अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
