मार्कंडा देवस्थानात वैनगंगेच्या तीरावर प्रथमच महागंगा पूजा-आरती; भक्तिमय वातावरणात सोहळा.
माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती
गडचिरोली |चामोर्शी . दि. १७ ऑगस्ट २०२६
चामोर्शी तालुक्यातील ‘विदर्भाची काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक मार्कंडेश्वर देवस्थान येथे श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर प्रथमच ‘महागंगा पूजा-आरती’चा धार्मिक सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, श्रावणातील प्रत्येक सोमवारी महागंगा पूजा-आरती आयोजित करण्यात येणार आहे.
यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी मार्कंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात विधिवत पूजा-अर्चना व आरती करून दर्शन घेतले. त्यानंतर वैनगंगा नदीच्या तीरावर मंत्रोच्चार, ‘ॐ नमः शिवाय’ आणि महामृत्युंजय मंत्राच्या पठणात गंगापूजन व महाआरती करण्यात आली.

शंखनाद, डमरूचा निनाद आणि ‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’ च्या जयघोषाने संपूर्ण वैनगंगा तीर दुमदुमून गेला. दीपप्रज्वलनाने झालेल्या आरतीदरम्यान भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले.
या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहाय्यक सुनील मित्रा, अनिरुद्ध पालकर, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, नागपूरचे आमदार मोहन मते, जिल्हाधिकारी अविशयांत पंडा, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध महाराज मंडळी आणि हजारो भाविक उपस्थित होते.

श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी वैनगंगेच्या तीरावर सुरू झालेल्या या महागंगा पूजा-आरतीमुळे मार्कंडा देवस्थानच्या धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक वैभवात नवा अध्याय जोडला गेला आहे. या उपक्रमामुळे मार्कंडेश्वर देवस्थानचे धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित होण्यासोबतच वैनगंगा नदीच्या पवित्र तीराला नव्या धार्मिक परंपरेची जोड मिळाल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.
