धानोरा पोलिसांची अवैध दारूविरोधात धडक कारवाई; ३ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल नष्ट.

0
IMG-20260817-WA0203
Spread the love

            प्रेस नोट

वानरचुवा जंगल परिसरात दोन ठिकाणी छापे; हातभट्टी दारू निर्मिती व साठवणुकीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

धानोरा प्रतिनिधी| दि. १७ ऑगस्ट २०२६ : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करून विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरोधात धानोरा पोलिसांनी धडक कारवाई केली. १६ ऑगस्ट रोजी वानरचुवा परिसरात दोन स्वतंत्र ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल ३ लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अवैध दारूविक्री व साठवणुकीविरोधात कारवाई सुरू आहे. त्याच अनुषंगाने धानोरा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वानरचुवा येथील जंगल परिसरात सापळा रचण्यात आला.

हातभट्टीची भट्टी उद्ध्वस्त

पहिल्या कारवाईत प्रमोद अंताराम हलामी (वय ४२, रा. वानरचुवा) हा मोहफुलाच्या सडव्यापासून हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या घरामागील जंगल परिसरात पाहणी केली असता अवैध हातभट्टी आढळून आली. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी जंगलाचा फायदा घेत पसार झाला.

पंचांसमक्ष केलेल्या पाहणीत १५ प्लास्टिक ड्रममध्ये सुमारे ३ हजार किलो मोहफुलाचा सडवा, अंदाजे किंमत ३ लाख रुपये, तसेच २० लिटर हातभट्टी दारू, किंमत ४ हजार रुपये, असा एकूण ३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळला. सदर साहित्य, दारू व मोहफुलाचा सडवा नियमानुसार घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.

या प्रकरणी धानोरा पोलीस ठाण्यात अप. क्र. ८८/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (क), ६५ (ड), ६५ (ई), ६५ (फ) अन्वये फरार आरोपी प्रमोद हलामी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरालगतच्या झोपडीत २०० लिटर मोहफुलाची दारू

दुसऱ्या कारवाईत शिवराम अन्नाजी बोगा (वय ४५, रा. वानरचुवा) याच्या घरालगतच्या झोपडीवर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी २०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक ड्रममध्ये सुमारे २०० लिटर मोहफुलाची दारू, अंदाजे ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल, आढळून आला. सदर दारूही नियमानुसार घटनास्थळीच नष्ट करण्यात आली.

या प्रकरणी धानोरा पोलीस ठाण्यात अप. क्र. ८९/२०२६, कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये शिवराम बोगा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा जगदिश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास गवते, पोलीस उपनिरीक्षक अजय कोरडे तसेच पोलीस कर्मचारी जन्हेरसिंग उसेंडी, सुशील मेश्राम, प्रशांत ताडोसे, राहुल बनकर, विक्रांत मोहुर्ले आणि महिला पोलीस अंमलदार प्रियंका कावळे यांनी पार पाडली.

अवैध दारूविरोधातील या कारवाईमुळे धानोरा परिसरात अवैध हातभट्टी व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!