अनुदानित खतांचे आता मोबाईलवरून बुकिंग; जिल्ह्यात ‘एफएफएस’ प्रणाली लागू होणार.

0
Spread the love

 

२२ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी; बुकिंगनंतर तीन दिवसांत खत खरेदीची सुविधा

गडचिरोली, दि. १९ ऑक्टोबर : जिल्ह्यातील खत विक्री प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी रब्बी हंगाम २०२६ मध्ये २२ ऑक्टोबरपासून ‘एफएफएस’ (फार्मर फर्टिलायझर सिस्टीम) ही डिजिटल प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना मोबाईलवरून अनुदानित खतांचे ऑनलाइन बुकिंग करता येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

शेतकऱ्यांनी Google Play Store वरून ‘FFS’ अ‍ॅप डाउनलोड करून स्वतःची नोंदणी करावी. नोंदणी करताना जमीन व पिकांची अचूक माहिती भरून आवश्यक अनुदानित खतांचे ऑनलाइन बुकिंग करावे.

बुकिंग केल्यानंतर पुढील तीन दिवसांत शेतकरी किंवा त्यांचे प्रतिनिधी संबंधित कृषी सेवा केंद्रावर जाऊन खत खरेदी करू शकतील. प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी अ‍ॅपमधील ‘क्यूआर कोड’ अधिकृत खत विक्रेत्याला दाखवावा लागेल. त्यानंतर विक्रेत्यामार्फत खत विक्रीची डिजिटल नोंद केली जाईल. या व्यवस्थेमुळे खत खरेदीचे नियोजन सुलभ होऊन कृषी सेवा केंद्रांवरील गर्दी व प्रतीक्षेचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे.

अ‍ॅप डाउनलोड करणे, ‘फार्मर आयडी’ तयार करणे, जमीन व पिकांची नोंद करणे किंवा ऑनलाइन बुकिंग प्रक्रियेत अडचण आल्यास संबंधित तालुक्यातील गुणनियंत्रण निरीक्षक अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!