ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या अटींमध्ये सुधारणा.

0
Spread the love

 

पात्र विद्यार्थ्यांना दहा महिन्यांसाठी ३८ ते ४३ हजार रुपये अर्थसहाय्य

गडचिरोली, दि. १९ ऑक्टोबर : उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’च्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या १५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार या सुधारणा लागू करण्यात आल्या आहेत. योजनेत पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेचे ठिकाण व क्षेत्रानुसार भोजन, निवास व निर्वाह भत्त्यापोटी दहा महिन्यांसाठी प्रतिविद्यार्थी एकूण ३८ हजार ते ४३ हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य अनुज्ञेय राहणार आहे.

सुधारित तरतुदींनुसार, गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरू असल्याने येथील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार योजनेचा लाभ घेण्यापूर्वी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक राहील. तालुक्याच्या ठिकाणी शासकीय वसतिगृह सुरू झालेले नसल्यास विद्यार्थ्यांना थेट आधार योजनेसाठी अर्ज करता येईल.

योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड राष्ट्रीयीकृत बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५ टक्के असणे बंधनकारक असून, प्रत्येक तिमाहीचे उपस्थिती प्रमाणपत्र संबंधित शैक्षणिक संस्थेकडून प्राप्त करून तिमाही संपल्यानंतर १५ दिवसांच्या आत पोर्टलवर अपलोड करावे लागेल.

पदवी अभ्यासक्रमासाठी बारावीमध्ये, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवीमध्ये किमान ५० टक्के गुण आवश्यक आहेत. दहावीनंतर पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून पदवीच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदविकेच्या अंतिम वर्षातील गुण ग्राह्य धरले जातील. त्यासाठीही किमान ५० टक्के गुणांची अट राहील. सीजीपीए पद्धतीने गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी त्याचे टक्केवारीत रूपांतर केल्याबाबतचे महाविद्यालयाचे प्रमाणपत्र ऑनलाइन अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे.

मॅट्रिकोत्तर योजनेतून शासनाचा निर्वाह भत्ता मिळालेल्या विद्यार्थ्यांना आधार योजनेतून पूर्ण निर्वाह भत्ता देण्यात येणार नाही. संबंधित महाविद्यालयाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर उर्वरित अनुज्ञेय रक्कम अदा करण्यात येईल.

विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरू झालेल्या तारखेपासून लाभ देणे, दीर्घ कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी निर्धारित कालावधीनुसार लाभ देणे आणि नूतनीकरणासाठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा नियमानुसार भरणे, अशा तरतुदीही करण्यात आल्या आहेत. तसेच, शासकीय वसतिगृहापासून महाविद्यालय १५ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असल्यास आणि वसतिगृह गैरसोयीचे ठरत असल्यास संबंधित विद्यार्थ्याच्या संमतीने नियमानुसार आधार योजनेचा लाभ देता येईल.

पात्र विद्यार्थ्यांनी सुधारित शासन निर्णयातील अटी व शर्तींची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालक डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!