चामोर्शी रुग्णालयातील गंभीर प्रश्न ; एकच वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञही अनुपस्थित.

0
IMG-20261016-WA0367
Spread the love

 

किमान तीन वैद्यकीय अधिकारी व एक स्त्रीरोगतज्ज्ञ नियुक्त करण्याची मागणी- आसपा, माकप व आप ची मागणी

चामोर्शी | दि. १६ ऑक्टोबर २०२६: चामोर्शी तालुक्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची विदारक परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. आज, शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाला आझाद समाज पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, डॉ. प्रशांत सातार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अमोल मारकवार आणि आम आदमी पार्टीचे नासिर भाई शेख यांनी भेट दिली असता, रात्रीच्या वेळी केवळ एकच वैद्यकीय अधिकारी रुग्णसेवेसाठी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. या गंभीर परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरोग्याचा आणि आपत्कालीन उपचार व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

*७६ ग्रामपंचायती, १२६ गावांचा तालुका; मात्र रात्री एकच डॉक्टर!-*

चामोर्शी तालुक्यात एकूण ७६ ग्रामपंचायती आणि १२६ गावे आहेत. लोकसंख्या व भौगोलिक विस्ताराच्या दृष्टीने हा जिल्ह्यातील मोठ्या तालुक्यांपैकी एक तालुका आहे. तालुक्यातील ग्रामीण जनतेसाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालय हे अत्यंत महत्त्वाचे *एकमेव आरोग्य केंद्र* आहे. असे असताना रात्रीच्या वेळी रुग्णालयात केवळ डॉ. रॉय हे एकमेव वैद्यकीय अधिकारी उपस्थित असल्याचे आढळले.

रुग्णांची संख्या मोठी असताना आणि विविध गावांमधून रुग्ण उपचारासाठी येत असताना एकाच डॉक्टरवर संपूर्ण रुग्णालयाचा भार टाकणे कितपत योग्य आहे? एखाद्या वेळी अनेक गंभीर रुग्ण दाखल झाल्यास किंवा अपघातासारखी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास उपचारांचे व्यवस्थापन कसे केले जाणार? असा सवाल या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

रात्री स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने गर्भवती महिलांच्या उपचारांचा प्रश्न-

रुग्णालयात रात्रीच्या वेळी एकही स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynaecologist) उपस्थित नसल्याची बाबही निदर्शनास आली. गर्भवती महिला, प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या माता आणि स्त्रीरोगविषयक आपत्कालीन परिस्थितींमध्ये तातडीने तज्ज्ञ उपचार मिळणे महत्त्वाचे असते. अशा वेळी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यास रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

तसेच, *वैद्यकीय अधीक्षक निवासी स्वरूपात उपलब्ध राहत नसल्याचा* मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.

परिचारिकांवरच रुग्णालयाचा भार?

रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थिती पाहता परिचारिका अर्थात सिस्टर यांची मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू असल्याचे दिसून आले. उपलब्ध कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवेचा प्रचंड ताण असल्याचे चित्र होते. एकीकडे परिचारिकांची धावपळ आणि दुसरीकडे एकमेव वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉय यांच्यावर असलेला कामाचा भार पाहता, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाच्या परिस्थितीचा आणि मानसिक तणावाचा विचार करणेही तितकेच आवश्यक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

तीन पक्षांची ठाम मागणी–

चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आझाद समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील मागण्या केल्या आहेत.

1. रात्रीच्या वेळी रुग्णालयात किमान तीन वैद्यकीय अधिकारी उपलब्ध ठेवावेत.
2. रात्रीच्या ड्युटीसाठी किमान एक स्त्रीरोगतज्ज्ञ नियुक्त करून त्यांची उपलब्धता सुनिश्चित करावी.
3. रुग्णालयातील डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि मनुष्यबळाची कमतरता तातडीने दूर करावी.
4. रुग्णसेवेचा वाढता भार लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

चामोर्शी तालुक्यातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची पुरेशी उपलब्धता नसेल, तर त्याचा सर्वाधिक फटका गरीब, आदिवासी, ग्रामीण भागातील नागरिक, गर्भवती महिला आणि आपत्कालीन रुग्णांना बसू शकतो.

त्यामुळे आरोग्य प्रशासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सुधारणा कराव्यात. रुग्णालयात आवश्यक डॉक्टर उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे; केवळ एका डॉक्टरच्या भरवशावर संपूर्ण तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेचा भार टाकणे योग्य नाही, अशी ठाम भूमिका आझाद समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

आता आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रत्यक्षात कोणती पावले उचलतात, याकडे चामोर्शी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!