गणपुरात वादानंतर २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मृत्यूचे गूढ कायम!
Oplus_131072
किरकोळ बाचाबाचीनंतर तरुण अचानक कोसळला; शरीरावर जखमा नसल्याची प्राथमिक माहिती, शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष

चामोर्शी : तालुक्यातील गणपुर येथे किरकोळ वादानंतर एका २७ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. चंद्रशेखर बाजीराव पाल (वय २७, रा. गणपुर) असे मृत तरुणाचे नाव आहे. वादानंतर काही वेळातच तो बेशुद्ध होऊन कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, चामोर्शी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.
दुकानासमोर झाला वाद
मिळालेल्या माहितीनुसार, गणपुर येथील उल्हास तिमोडे यांच्या दुकानासमोर चंद्रशेखर पाल आणि प्रतीक शंकर आलाम (वय २१, रा. गणपुर) यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी चंद्रशेखर हा दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येते. वादादरम्यान त्याने प्रतीकची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. घटनास्थळी उपस्थित शुभम बंडू डोके यांनी मध्यस्थी करत दोघांमधील वाद मिटविला.
मात्र, काही वेळानंतर चंद्रशेखर पुन्हा प्रतीकच्या दिशेने जात असताना अचानक खाली कोसळला आणि बेशुद्ध झाला. तो नेमका कशामुळे पडला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी मृत घोषित केले
चंद्रशेखर बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच शुभम डोके आणि इतरांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला शुद्ध आली नाही. त्यानंतर नातेवाइकांनी त्याला येणापूर येथील रुग्णालयात नेले. तेथे दाखल करून घेण्यात न आल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे आणण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शरीरावर जखमा नसल्याची माहिती
घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतदेहाची पाहणी केली. यावेळी मृताच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नसल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली. प्राथमिक चौकशीत प्रतीक आलाम याने चंद्रशेखरला ढकलल्याचे सांगणारा कोणताही प्रत्यक्षदर्शी आढळला नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
शवविच्छेदन अहवालातून उलगडा होणार?
या प्रकरणी घटनास्थळाचा पंचनामा आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, नातेवाइकांच्या तक्रारीनंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण काय, तरुण अचानक कशामुळे कोसळला आणि घटनेमागे अन्य काही कारण आहे का, या प्रश्नांची उत्तरे शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या पुढील तपासातून स्पष्ट होणार आहेत.
चामोर्शी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून, अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

