चिचडोह पुलावर मध्यरात्री मगर; वैनगंगा नदीकाठी सतर्कतेचा इशारा.
Oplus_131072
कुत्र्यांच्या भुंकण्याने प्रकार उघड; नागरिकांसह मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन

चामोर्शी | गडचिरोली : वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेज पुलावर मध्यरात्री मगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गुरुवारी (८ ऑक्टोबर) रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास नदीपात्रातून मगर थेट पुलावर आल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मगरीला सुरक्षितपणे नदीपात्रात हाकलून लावले. त्यामुळे संभाव्य धोका टळला असून, नागरिकांनी व मच्छीमारांनी नदीपात्रात जाताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कुत्र्यांच्या भुंकण्याने सुरक्षा रक्षकांचे लक्ष वेधले
चिचडोह बॅरेज पुलावरील रस्ता सकाळपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येतो. त्यानंतर लोंढोली आणि चामोर्शी या दोन्ही बाजूंची प्रवेशद्वारे बंद केली जातात. पुलाच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा रक्षक तैनात असतात.
गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास नदीपात्रातून मगर पुलावर आली. यावेळी पुलावरील कुत्रे जोरजोरात भुंकू लागल्याने सुरक्षा रक्षकांचे लक्ष त्या दिशेने गेले. सुरक्षा रक्षक लिखित धोडरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घोट पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विकास दूधबावरे यांना घटनेची माहिती दिली.
वन विभागाची तत्परता; मगरीला नदीत परतवले
शाखा अभियंता विकास दूधबावरे यांनी चामोर्शी वन विभागाचे क्षेत्रसहाय्यक सलीम कुरेशी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तलोधी येथील वनरक्षक प्रमोद धाडसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मगर पुलावरच असल्याने तिला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली होती.
वन विभागाच्या पथकाने परिस्थिती नियंत्रणात घेत मगरीला वैनगंगा नदीच्या पात्रात हाकलून लावले. वेळीच कारवाई झाल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
नदीकाठी वावरणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी
चिचडोह बॅरेज पुलावर मगर आढळल्याच्या घटनेनंतर वैनगंगा नदीच्या परिसरात वावरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नदीत मासेमारी करणारे मच्छीमार, नदीकाठी जाणारे नागरिक आणि पाण्यासाठी नदीपात्रात उतरणाऱ्या व्यक्तींनी विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. नदीपात्रात मगर दिसल्यास तिच्याजवळ जाणे, गर्दी करणे किंवा तिला त्रास देण्याचा प्रयत्न करणे टाळावे.
“नदीपात्रात मगरीचे अस्तित्व लक्षात घेता नागरिकांनी आणि मच्छीमारांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. कोणताही धोका पत्करू नये,” असे आवाहन घोट पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विकास दूधबावरे यांनी केले आहे.

