जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकरी महिलांचा एल्गार; दर मंगळवारी आंदोलनाचा निर्धार.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

रामाळा-घारगाव-फराडा-मोहर्लीत शांततामय रॅली; १४ गावांतील शेतकऱ्यांची एकजूट

चामोर्शी : जमीन अधिग्रहणाच्या प्रस्तावाविरोधात शेतकरी महिलांचा संताप पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. रामाळा, घारगाव, फराडा आणि मोहर्ली परिसरातील शेतकरी महिला व ग्रामस्थांनी सोमवारी (६ ऑक्टोबर) एकत्र येत शांततामय रॅली काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. जमीन, उपजीविका आणि भवितव्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त करत महिलांनी आपल्या हक्कांसाठी ठाम भूमिका मांडली.

रामाळा येथून सुरू झालेल्या या रॅलीत चारही गावांतील शेतकरी महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. घोषणांनी परिसर दणाणून सोडत जमीन अधिग्रहणाला विरोध करण्यात आला. शेतकऱ्यांच्या जमिनींचे संरक्षण झाले पाहिजे, अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला.

घारगाव, रामाळा आणि फराडा येथून आलेल्या रॅलीचा समारोप मोहर्ली येथे करण्यात आला. यावेळी शेतकरी महिलांनी कोणत्याही प्रकारचा हिंसक मार्ग न स्वीकारता लोकशाही व शांततामय पद्धतीने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला.

जमीन अधिग्रहणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत दर मंगळवारी शांततामय आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा शेतकरी महिलांनी केली. त्यामुळे आगामी काळात या आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, १४ गावांतील शेतकरी आणि महिलांची वाढती एकजूट पाहता जमीन अधिग्रहणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!