पैसे भरले, बुकिंग झाले; तरीही रेती मिळेना! वाघोली रेती डेपोच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; गरीब-गरजूंची घरबांधकामे रखडली.
Oplus_131072
चामोर्शी | प्रतिनिधी :
शासनाला नियमानुसार पैसे भरून रेतीचे बुकिंग करूनही नागरिकांना प्रत्यक्ष रेती मिळत नसल्याचा प्रकार चामोर्शी तालुक्यातील वाघोली रेती डेपोच्या संदर्भात समोर आला आहे. त्यामुळे घरबांधकामासाठी रेतीच्या प्रतीक्षेत असलेल्या गरीब व गरजू नागरिकांची कामे रखडली असून, रेती वितरणाच्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या प्रकाराची दखल घेत शिवसेना चामोर्शी शहरप्रमुख राजु धोडरे यांनी तहसीलदारांकडे अर्ज करून बुकिंग केलेल्या नागरिकांना तातडीने रेती उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या निर्देशांचाही संदर्भ देण्यात आला.
तहसीलदार चामोर्शी यांनी संबंधित पत्रातून चामोर्शी, घोट आणि आष्टी परिसरातील काही नागरिकांनी स्वतःच्या घरबांधकामासाठी शासननिर्मित रेती डेपोमधून रेतीचे बुकिंग केल्याचे नमूद केले आहे. मात्र, संबंधित रेती डेपो धारकांकडून बुकिंग केलेली रेती उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याने अनेक नागरिकांची घरबांधकामे अर्धवट अवस्थेत असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
गरीब आणि गरजू शेतकरी नागरिकांचा विशेष विचार करून त्यांना बुकिंग केलेली रेती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. तसेच रेती उपलब्ध करून न दिल्यास तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडे सादर करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
पैसे भरूनही प्रतीक्षा का?
शासनाकडे रक्कम जमा करून अधिकृत पद्धतीने रेती बुकिंग केल्यानंतरही नागरिकांना रेतीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रशासनाच्या वितरण व्यवस्थेवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. पैसे भरून बुकिंग केलेल्या पात्र नागरिकांना रेती मिळण्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन बुकिंग केलेल्या पात्र नागरिकांना विलंब न करता रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

