OBC जनगणनेत स्वतंत्र कॉलमसाठी सकल OBC समाज आक्रमक.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

२५ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन; मागणी मान्य न झाल्यास जनगणना बहिष्काराचा इशारा

गडचिरोली : आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीय (OBC) समाजासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून देण्यासह जात नोंदणीसाठी संगणकीय ‘ड्रॉप-डाऊन मेन्यू’ लागू करण्यात यावा, या मागणीसाठी सकल OBC समाजाने केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मागणी मान्य न झाल्यास २५ ऑक्टोबर २०२६ पासून देशव्यापी तीव्र जनआंदोलन छेडण्याचा तसेच जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात सकल OBC महामोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन साद करण्यात आले.

OBC समाजाची अचूक लोकसंख्या समोर आल्याशिवाय सामाजिक न्यायाच्या धोरणांची आखणी, विकास योजनांचे नियोजन, शिक्षण, रोजगार, आरक्षण तसेच अर्थसंकल्पीय तरतुदी प्रभावीपणे करता येणार नाहीत, असा दावा संघटनेने निवेदनातून केला आहे.

ओपन-एंडेड जात नोंदणीला विरोध

जात नोंदणी ओपन-एंडेड पद्धतीने केल्यास जाती व पोटजातींच्या विविध नावांमुळे भविष्यातील आकडेवारीचे वर्गीकरण आणि विश्लेषण करताना अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

२०११ मधील सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात विविध जातींच्या नावांतील उच्चार, स्पेलिंग आणि स्थानिक नामकरणामुळे मोठ्या प्रमाणावर नोंदी निर्माण झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकृत मागासवर्गीय याद्यांच्या आधारे संगणकीय ‘ड्रॉप-डाऊन मेन्यू’ तयार करून जात नोंदणीची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘स्वतंत्र कॉलम नसेल तर सहभाग नाही’

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र नोंदणीची व्यवस्था असताना OBC समाजासाठीही स्वतंत्र कॉलम असणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. स्वतंत्र कॉलमच्या अभावामुळे OBC समाजाची वास्तविक लोकसंख्या आणि सामाजिक-आर्थिक स्थितीचे अचूक चित्र समोर येणार नाही, असा दावा करण्यात आला.

यामुळे “जनगणनेत OBC समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसेल, तर जनगणनेत सहभाग नसेल,” अशी भूमिका सकल OBC समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आली.

२५ ऑक्टोबरपासून आंदोलनाची घोषणा

OBC समाजाच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेऊन जनगणना प्रक्रियेत स्वतंत्र OBC कॉलम आणि संगणकीय ड्रॉप-डाऊन यादीचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास २५ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

मागण्या मान्य न झाल्यास आगामी जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची भूमिकाही संघटनेने जाहीर केली आहे.

मोठ्या संख्येने OBC बांधवांची उपस्थिती

निवेदन साद करताना लोकमान्य बरडे, धनपाल मिसार, प्रा. दामोदर शिंगाडे, अनिल कोठारे, राहुल भांडेकर, लीलाधर भरडकर, भावेश मुंगणकर, मिलिंद खोब्रागडे, सुरेश भांडेकर, संतोषी सूत्रपवार, सागर वाढई, अरुण कुंभलवार, चंद्रकांत शिवणकर, दादाजी चौधरी, कमलेश बारस्कर, भास्कर पिपरे, महेंद्र ठवरे, प्रांजल धाबेकर, गौरी मंगर, तुलाराम नैताम, मेघराज बुराडे, जीवन शिवणकर, दादाजी खरकाटे, पुंडलिक देशमुख, सूर्यभान सेलोटे, एकनाथ पिलारे, महेंद्रजी लटारे, गौरव येणपरेड्डीवर, पंकज धोटे, गजानन शेलोटे, ज्ञानदेव पिलारे, राजेंद्र बुल्ले, हरिभाऊ पत्रे, सदाराम ठाकरे, रामजी धोटे, चक्रधर पारधी, परासराम ठाकरे, नितीन राऊत, योगेश ढोरे, विलास ठाकरे, ज्ञानेश्वर कवासे, नितेश अवसरे, संदीप वाघाडे, शैलेंद्र वाघमारे, विष्णू दुणेदार, महेश पिलारे, नरेशजी चौधरी यांच्यासह सकल OBC समाजाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!