विमानतळ प्रकल्पाविरोधातील उपोषणाला महेंद्र ब्राम्हणवाडेंचा जाहीर पाठिंबा.
Oplus_131072
गडचिरोली : विमानतळ निर्मितीसाठी शासनाने १२ मे २०२६ रोजी दिलेली वित्तीय व प्रशासकीय मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी राखी-गुरवळा येथील आंबेडकर चौक परिसरात शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनस्थळी भेट देत गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा शेतकरी नेते महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
विमानतळासाठी प्रस्तावित जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध असून, या निर्णयाविरोधात यापूर्वीही निवेदने, आंदोलने आणि शासन-प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाच्या निर्णयात बदल झालेला नसल्याने शेतकऱ्यांनी गांधी जयंतीच्या दिवशी लोकशाही व शांततामय मार्गाने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.


यावेळी बोलताना महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी “शेतकऱ्यांच्या जमिनी आणि उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने १२ मे २०२६ रोजीचा विमानतळ निर्मितीसंदर्भातील वित्तीय व प्रशासकीय मान्यतेचा शासन आदेश रद्द करून या निर्णयाचा फेरविचार करावा,” अशी मागणी केली.
शासनाने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांची भूमिका गांभीर्याने ऐकून घ्यावी. आंदोलनाची तातडीने दखल घेऊन मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी शिवसेना नेते हेमंत जंबेवार, रिपब्लिक पार्टीचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदासजी राऊत, आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्राचार्य प्रकाशजी दुबे, प्रा. राजन बोरकर, वसंत राऊत, राजेश ठाकूर, विजय लाड, दिवाकर निसार, तात्याजी चिचघरे, परीक्षित बांबोळे, घिवरु मेश्राम, हरिजी मडावी, अनिल कोठारे, अरविंद बोदलकर, विकास जेंगठे, स्वप्निल बेहेरे यांच्यासह शेतकरी, शेतमजूर, युवक-युवती, महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

