जिल्ह्यातील युवक व महिलांना रोजगारासाठी ‘मॅजिक बस’चे प्रशिक्षण व मार्गदर्शन.

0
IMG-20261002-WA0291
Spread the love

 

गडचिरोली, दि. 2 : जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी व वनालगतच्या भागातील युवक-युवती आणि महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व अहेरी येथील दुर्गम भागात ‘मॅजिक बस इंडिया फाउंडेशन’च्या माध्यमातून ‘लाइव्हलीहूड रिसोर्स सेंटर’ मॉडेल प्रभावीपणे राबवले जात आहे. या उपक्रमात कौशल्य प्रशिक्षण, करिअर समुपदेशन आणि रोजगाराशी जोडणी यावर भर देण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत नागरिकांपर्यंत रोजगाराच्या संधी पोहोचविण्यासाठी स्थानिक गरजा आणि उपलब्ध रोजगार व व्यवसायाच्या संधींचा अभ्यास करून प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येते. प्राथमिक संवाद साधण्यापासून त्यांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईपर्यंत सातत्याने मार्गदर्शन व पाठपुरावा करणे, हे या उपक्रमाच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य आहे.

नोकरी करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींना करिअर समुपदेशन, कौशल्य विकास आणि कंपन्या व उद्योगांशी जोडणीसाठी मदत केली जाते. नोकरी मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठीही मार्गदर्शन करण्यात येते.

कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे घरापासून दूर जाऊन काम करणे शक्य नसलेल्या युवक व महिलांसाठी स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराच्या संधी विकसित करण्यावर भर दिला जातो. यासाठी आवश्यक कौशल्ये, भांडवलाशी जोडणी आणि बाजारपेठ मिळविण्यासाठी साहाय्य केले जाते. विशेषतः महिलांना व्यवसाय नियोजन, आर्थिक साहाय्याशी जोडणी आणि व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन देऊन उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाते.

स्थानिक प्रशासन व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या समन्वयातून उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशिक्षणानंतर लाभार्थ्यांना रोजगार मिळाला आहे का, त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे का आणि ते नोकरी अथवा व्यवसायात टिकून आहेत का, याचाही नियमित पाठपुरावा केला जातो.

याबाबत अधिक माहितीसाठी अहेरी केंद्राच्या व्यवस्थापक स्नेहा भानरकर यांच्याशी मोबाईल क्रमांक ९०६७९३५४१८, तसेच धानोरा केंद्राचे व्यवस्थापक अमोल यादव यांच्याशी मोबाईल क्रमांक ९५०३००६७०८ यावर संपर्क साधता येईल असे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!