चामोर्शीत विद्यार्थ्यांचा बससेवेसाठी एल्गार; आझाद समाज पार्टीचा(ASP) आंदोलनाला पाठिंबा.
वेळापत्रकातील विस्कळीतपणा आणि जुन्या बसेसमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; वेळेत बस न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

चामोर्शी : बाहेरगावाहून चामोर्शीत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर बससेवा उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांनी परिवहन महामंडळाच्या कारभाराविरोधात एल्गार पुकारला आहे. वारंवार निवेदने देऊन आणि आंदोलन करूनही समस्या कायम असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आझाद समाज पार्टीने पाठिंबा जाहीर केला आहे.
चामोर्शी-वाघधरा, बोरी-गणपूर-जयरामपूर तसेच चामोर्शी-भेंडाळा-बोरी या मार्गांवरील बसेस अनेकदा दुपारी २ वाजल्यानंतर येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. त्यामुळे शाळा-महाविद्यालयात वेळेवर पोहोचणे विद्यार्थ्यांना कठीण होत असून, परतीच्या प्रवासातही त्यांना उशिरापर्यंत प्रवास करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक तसेच शैक्षणिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
याशिवाय जुन्या बसेस वारंवार नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.पावी- मुरांडा मार्गावरील बससेवेचीही अशीच परिस्थिती असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकाचा विचार करून नियमित व वेळेत बससेवा सुरू करावी तसेच नादुरुस्त बसेसऐवजी पर्यायी बस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, आंदोलनस्थळी आझाद समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ प्रशांत सातार आणि बंगाली आघाडीचे तालुकाध्यक्ष सुजय शाह यांनी भेट देत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे परिवहन महामंडळाने तातडीने लक्ष न दिल्यास आझाद समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रशांत सतार यांनी दिला.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी निगडित असलेल्या या प्रश्नावर परिवहन महामंडळ प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे

