सेवा संकल्प अभियानांतर्गत गडचिरोलीत बाल अस्थिरोग तपासणी शिबिर संपन्न; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार मोफत शस्त्रक्रिया.

0
IMG-20260927-WA0209
Spread the love

                           प्रेस नोट
​
​ गडचिरोली  :-
“सेवा संकल्प अभियान” अंतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी विशेष बाल अस्थिरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे (Pediatrics Ortho Screening & Surgery Camp) आयोजन करण्यात आले आहे.
​या उपक्रमांतर्गत दि. 23 सप्टेंबर 2026 रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथील जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रात (DEIC) पूर्वतपासणी शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये RBSK पथकांद्वारे व इतर ठिकाणांहून संदर्भित करण्यात आलेल्या एकूण 60 बालके आणि विद्यार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल अस्थिरोगविषयक तपासणी करण्यात आली.

*​२, ३ व ४ ऑक्टोबर रोजी चातगाव येथे होणार शस्त्रक्रिया*
तपासणीदरम्यान शस्त्रक्रियेची आवश्यकता भासलेल्या बालकांसाठी पुढील टप्प्यात दि. 02, 03 व 04 ऑक्टोबर 2026 रोजी ‘सर्च’ (SEARCH), शोधग्राम, चातगाव (गडचिरोली) येथे विशेष शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या बालकांच्या पुढील उपचार, शस्त्रक्रिया व आवश्यक संदर्भ सेवेचे नियोजन DEIC मार्फत करण्यात येत आहे.

​ तज्ज्ञ डॉक्टरांचे योगदान
शिबिरामध्ये मुंबई येथील ख्यातनाम बाल अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ. चासनल राठोड (M.S.) तसेच शोधग्राम चातगाव येथील बाल अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. आदित्य अगरवाल (M.S.) यांनी उपस्थित राहून बालकांची तपासणी केली व पुढील उपचारांची दिशा ठरवली.

या आजारांवर होणार उपचार
शिबिरात प्रामुख्याने जन्मजात पाय वाकडे असणे (Club Foot), चालताना गुडघे एकमेकांना लागणे, चालण्यास अडचण, सेरेब्रल पाल्सी (CP), डाऊन सिंड्रोम, विविध प्रकारचे अस्थिव्यंग (Orthopaedic Deformities), विकासातील विलंब (Developmental Delay) आणि वाढीचे टप्पे उशिरा गाठणे (Delayed Milestones) यांसारख्या विविध अस्थिरोगविषयक समस्यांची तपासणी करण्यात आली.

​जिल्ह्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांमधील शारीरिक विकृती व अस्थिरोगांचे वेळीच निदान करून त्यांना मोफत व दर्जेदार उपचार मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत कार्यरत असलेले “डीईआयसी” (DEIC) हे बालकांसाठी द्वितीयस्तरीय संदर्भसेवा कक्ष म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
​सदर शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रवी गावंडे जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!