‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी-कार्यकर्त्याने नियोजनबद्ध सहभाग घ्यावा : माजी खासदार डॉ. अशोकजी नेते.
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विविध सेवाभावी उपक्रम; ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्याचे आवाहन.
गडचिरोली, दि. १६ सप्टेंबर २०२६ :
गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणारे ‘सेवा संकल्प अभियान’ व्यापक आणि प्रभावीपणे यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बूथस्तरीय कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी केले.
गडचिरोली जिल्ह्यात महिनाभर चालणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून विविध सेवाभावी, सामाजिक, जनजागृतीपर तसेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यकर्त्यांनी आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या, शेतीचा हंगाम आणि सण-उत्सव यांचे योग्य नियोजन करून अभियानातील प्रत्येक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे डॉ. नेते यांनी सांगितले.
१७ सप्टेंबरला ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रम
अभियानाची सुरुवात १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा’ या उपक्रमाने होणार आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरी देवाजवळ श्रद्धेने दिवा प्रज्वलित करून त्याचा फोटो अथवा सेल्फी काढावा आणि सरल ॲपवर अपलोड करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“आपण आपल्या घरी दररोज देवाजवळ श्रद्धेने दिवा प्रज्वलित करतो. त्याच श्रद्धेच्या भावनेतून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि देशसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी त्यांना आशीर्वादरूपी दिवा लावायचा आहे,” असे डॉ. नेते यांनी सांगितले.
प्रत्येक बूथवर किमान १० घरांमध्ये ‘आशीर्वादाचा दिवा’
‘आशीर्वादाचा दिवा’ हा उपक्रम केवळ पक्षाच्या कार्यकर्त्यांपुरता मर्यादित न राहता जनतेपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक बूथवर किमान १० घरांमध्ये हा दिवा प्रज्वलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, बूथ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिक तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थी कुटुंबांशी संपर्क साधून त्यांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या पीएम-किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र शेतकरी कुटुंबांपासून ते प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत विविध घटकांशी संपर्क साधून त्यांना या उपक्रमाशी जोडण्यावर भर देण्यात येणार आहे.
‘आशीर्वादाचा दिवा’ म्हणजे कृतज्ञता आणि सद्भावनेची भावना
देशाच्या विकासासाठी आणि जनकल्याणासाठी कार्य करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना नागरिकांचे आशीर्वाद लाभावेत, त्यांना दीर्घायुष्य लाभावे आणि देशसेवेचे कार्य अधिक सामर्थ्याने पुढे नेण्यासाठी त्यांना ऊर्जा मिळावी, या सद्भावनेतून ‘आशीर्वादाचा दिवा’ हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे डॉ. नेते यांनी स्पष्ट केले.
फोटो संकलन व सरल ॲपवरील नोंदणीवर विशेष भर
अभियानातील उपक्रमांची प्रभावी नोंद राहावी यासाठी प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यांनी उपक्रमाचे नियोजन, नागरिक व लाभार्थ्यांशी संपर्क, फोटो संकलन तसेच सरल ॲपवरील नोंदणी याकडे विशेष लक्ष द्यावे. अभियानाची माहिती संबंधित स्तरापर्यंत व्यवस्थित पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी समन्वयाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करावे, असेही डॉ. नेते यांनी सांगितले.
दरम्यान, ‘सेवा संकल्प अभियान’च्या कालावधीत ‘आशीर्वादाचा दिवा’, विकसित भारत संकल्प यात्रा, पवित्र जल संकलन यांसह विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येक स्तरावर नियोजन करण्यात येत आहे.
‘सेवा संकल्प अभियान’ ही समाजाशी जोडण्याची संधी
“सेवा संकल्प अभियान हे केवळ कार्यक्रमांचे आयोजन नाही, तर समाजाशी अधिक घट्टपणे जोडले जाण्याची आणि सेवाभावाची भावना दृढ करण्याची एक महत्त्वपूर्ण संधी आहे. प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने आपली जबाबदारी ओळखून नियोजनपूर्वक सहभाग घेतल्यास गडचिरोली जिल्ह्यात हे अभियान व्यापक स्वरूपात यशस्वी होईल,” असा विश्वास डॉ. अशोकजी नेते यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी सेवा संकल्प अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
तसेच, उद्या दि. १७ सप्टेंबर रोजी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे आणि देशसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्याचे बळ मिळावे, अशी मनःपूर्वक प्रार्थना व सदिच्छा व्यक्त करतो, असे डॉ. अशोकजी नेते यांनी सांगितले.
