जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे निलंबित; विभागीय चौकशीचे आदेश.
Oplus_131072

गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांच्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला आहे. १६ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन आदेशानुसार डॉ. लहाडे यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या कार्यपद्धतीची विभागीय चौकशी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
शासन आदेशानुसार, पर्यवेक्षकीय जबाबदारी पार पाडताना निष्काळजीपणा व दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका डॉ. लहाडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या आरोपांची सविस्तर चौकशी करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.
निलंबनाच्या काळात डॉ. लहाडे यांचे मुख्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया निश्चित करण्यात आले आहे. सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.
तसेच निलंबन कालावधीत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांनुसार खासगी नोकरी, व्यापार किंवा उद्योगात सहभागी होता येणार नसल्याचे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. नियमानुसार त्यांना निर्वाहभत्ता व अनुज्ञेय पूरक भत्ते मिळणार आहेत.
ही कारवाई महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने करण्यात आली असून, सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल महादेव कुमेरिये यांनी आदेशावर डिजिटल स्वाक्षरी केली आहे.
दरम्यान, डॉ. लहाडे यांच्यावरील आरोपांबाबत विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे निलंबनाची कारवाई ही चौकशीपूर्व प्रशासकीय कारवाई असून, आरोप सिद्ध झाल्याचा अंतिम निष्कर्ष या आदेशातून निघत नाही.
