निशिगंधा स्कूलचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र.
Oplus_131072
कारमेल अकॅडमीवर १२ धावांनी मात;
गडचिरोली/चामोर्शी : तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत चामोर्शी येथील निशिगंधा इंग्लिश स्कूलच्या १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. अंतिम सामन्यात कारमेल अकॅडमीच्या संघावर १२ धावांनी मात करत निशिगंधा स्कूलने स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. या विजयासह संघाची जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१५ सप्टेंबर रोजी हरडे कृषी महाविद्यालय येथे तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विविध शाळांमधील संघांनी सहभाग घेतला. १४ वर्षे वयोगटातील सामन्यांमध्ये निशिगंधा स्कूलच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच सातत्यपूर्ण कामगिरी करत अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामन्यात निशिगंधा स्कूलच्या संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात प्रभावी कामगिरी केली. सामन्याच्या अखेरीस १२ धावांनी विजय मिळवत संघाने तालुकास्तरीय विजेतेपद पटकावले. आता जिल्हास्तरीय स्पर्धेत निशिगंधा स्कूलचा संघ चामोर्शी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
विजयी संघात वंश वाढई, रणवीर पवार, स्वीकृत पोरेड्डीवार, सम्राट सहारे, शौर्य भुरसे, अरहान शेख, वोमीद बुरे, नक्ष पेंदाम, आदित्य हजारे, श्लोक करणे, सन्मय बोडूकवार, साहिल गाईन आणि प्रतीक पदा यांचा समावेश आहे.
संघाच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव विवेकभाऊ सहारे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. शाळेच्या प्राचार्यांसह संचालिका वालदे, शिक्षक हिराचंद उंदीरवाडे, मोरेश कुनघाडकर, सिंधू रामटेके, मनीषा अवताडे, फिलिप लिंमा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे कौतुक केले.
राहुल लोक विकास मंडळाच्या अध्यक्षा कौशल्या सहारे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माणिक साखरे, मंडळाचे पदाधिकारी, पालक व विद्यार्थ्यांनीही संघाचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
