ऋषिपंचमीनिमित्त मार्कंडेश्वर मंदिरात महिलांची मोठी गर्दी.
Oplus_131072
सप्तऋषी पूजनासाठी दूरवरून भाविक दाखल; पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभागाचा चोख बंदोबस्त
गडचिरोली/चामोर्शी : भाद्रपद शुक्ल पंचमी अर्थात ऋषिपंचमीच्या निमित्ताने विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्कंडादेव येथील श्री मार्कंडेश्वर मंदिरात महिला भाविकांची मोठी गर्दी झाली. सप्तऋषींचे पूजन करून व्रताची सांगता करण्यासाठी विविध भागांतून महिला भाविक दाखल झाल्याने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने गजबजून गेला.

ऋषिपंचमीचे व्रत महिलांसाठी धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी सप्तऋषींची विधिवत पूजा करून कुटुंबाचे सुख-समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना केली जाते. यंदा हरितालिका गौरी, गणेश चतुर्थी आणि ऋषिपंचमी हे सण एकाच कालावधीत आल्याने मार्कंडेश्वर मंदिरात भाविकांची विशेष वर्दळ पाहायला मिळाली.
मंदिर परिसरात पुरोहित व महाराजांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी सप्तऋषींची पूजाअर्चा केली. अनेक महिला भाविकांनी कुटुंबाच्या सुख-शांतीसाठी तसेच संकटे व दुःख दूर व्हावे, या श्रद्धेने ऋषिपंचमीचे व्रत पूर्ण केले. भाविकांची वाढती संख्या पाहता मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त
भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन चामोर्शी पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष व्यवस्था केली. पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी, शासकीय बोट, स्विमर तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांची नियुक्ती करण्यात आली होती. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी मार्कंडादेव परिसरात दोन्ही बाजूंनी नाकाबंदी करण्यात आली होती. वाहनांसाठी गावाबाहेर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली.
नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क
मार्कंडादेव परिसरातील नदीपात्रात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानेही विशेष खबरदारी घेतली. भाविकांनी खोल पाण्यात जाऊ नये, यासाठी नदीकाठावर लाल झेंडे लावण्यात आले. तसेच रबरी बोट, मदत केंद्र आणि आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली होती.
तहसीलदार प्रशांत यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सचिन मडावी, महसूल सहाय्यक गजभिये आणि माणिक कोडापे यांनी व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली.
जगन्नाथ बाबा मठात उपवासाच्या पदार्थांचे वितरण
दरम्यान, मंदिर परिसरात विविध महाराजांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचे उद्यापन व पूजाअर्चा पार पडली. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे ऋषिपंचमीचा धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला. जगन्नाथ बाबा मठ देवस्थानात भाविकांसाठी उपवासाच्या पदार्थांचे वितरण करण्यात आले.

