भिवापूर–लालडोंगरी बायपास रस्ता चिखलात; खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत.
Oplus_131072

चामोर्शी, दि. १७ सप्टेंबर : चामोर्शी तालुक्यातील भिवापूर येथून एकलव्य निवासी विद्यालयामार्गे लालडोंगरीकडे जाणाऱ्या बायपास रस्त्याची पावसामुळे मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी चिखलाचे थर साचल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
हरडे महाविद्यालयातील विद्यार्थी, दुचाकीस्वार तसेच स्थानिक नागरिकांची या मार्गावर नियमित वर्दळ असते. मात्र, चिखलामुळे दुचाकी घसरण्याच्या घटना घडण्याची शक्यता वाढली असून, वाहनचालकांना सावधपणे मार्गक्रमण करावे लागत आहे. पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चिखलातून वाट काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सततच्या पावसामुळे रस्त्याची स्थिती आणखी खराब होत असून, अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. योग्य पाण्याचा निचरा नसल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
तातडीने मुरूम टाकून रस्ता वाहतुकीस योग्य करावा
पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्त्यावर तातडीने मुरूम टाकावा, पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी आणि रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून तातडीने काम सुरू करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
