गडचिरोलीत मृतदेहासाठीही रुग्णवाहिका नाही; सालईटोल्यात ग्रामस्थांची पायपीट.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

मुख्यमंत्री पालकमंत्री असतानाही दुर्गम भागातील सुविधांची दुरवस्था; महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा सरकारवर निशाणा

गडचिरोली | प्रतिनिधी :
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील आरोग्य व मूलभूत सुविधांची दुरवस्था पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. धानोरा तालुक्यातील सालईटोला येथे मृतदेह वाहून नेण्यासाठी रुग्णवाहिका अथवा अन्य सुविधा उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थांना बांबूला खाट बांधून मृतदेह खांद्यावरून न्यावा लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सालईटोला परिसरात आरोग्य सेवा, रस्ते आणि वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. मात्र, एखाद्या नागरिकाच्या मृत्यूनंतरही त्याचा मृतदेह सन्मानाने नेण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या घटनेवरून काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी राज्य सरकारवर टीका केली. “गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री असतानाही दुर्गम भागातील नागरिकांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल, तर ही गंभीर बाब आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

सरकारकडून विकासाच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप ब्राह्मणवाडे यांनी केला. “मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ येत असेल, तर विकासाचा नेमका लाभ कुणाला मिळत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दुर्गम भागात तातडीने सक्षम आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, बारमाही रस्ते आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. सालईटोला येथील घटना ही केवळ एका कुटुंबाची व्यथा नसून दुर्गम भागातील आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेच्या वास्तवाची गंभीर जाणीव करून देणारी असल्याचेही त्यांनी म्हटले.

गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात नागरिकांना जीवनाच्या शेवटच्या प्रवासासाठीही खडतर वाट तुडवावी लागत असेल, तर प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!