गडचिरोलीतील तरुणांसाठी उच्च शिक्षणाच्या संधींवर रविवारी सामुदायिक संवाद.

0
gadchiroli_uchha_shikshan_samvad_50kb
Spread the love

 

ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी, मार्गदर्शन आणि सामाजिक सहभागावर होणार चर्चा

गडचिरोली : जिल्ह्यातील तरुणांना उच्च शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसमोरील शैक्षणिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी ‘गडचिरोली उच्च शिक्षण संवाद’ या विशेष सामुदायिक संवादाचे आयोजन रविवारी (१३ सप्टेंबर) करण्यात आले आहे.
‘आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नवी दिशा’ या संकल्पनेवर आधारित या संवादात उच्च शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांपर्यंत कशा पोहोचविता येतील, ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, योग्य मार्गदर्शन व मेंटरशिपमुळे विद्यार्थ्यांच्या संधी कशा वाढू शकतात, तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी समाजाची भूमिका काय असावी, यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
या कार्यक्रमात नालंदा अकॅडमी, वर्धाचे संस्थापक अनूप कुमार यांचा विशेष संवाद होणार असून, २०१३ पासूनच्या नालंदा अकॅडमीच्या प्रवासासह प्रस्तावित ‘Nalanda Abhiyan Campus’ या संकल्पनेबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी डॉ. सचिन मडावी (सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग), रोहिदास राऊत (रिपब्लिकन नेते), शाम रामटेके (जिल्हा संयोजक, लोकसंघ सोशल एज्युकेशन मूव्हमेंट), विनोद मडावी (आदिवासी हक्क कार्यकर्ते) आणि भीमराव जूंगारे (सामाजिक कार्यकर्ते) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
हा संवाद रविवार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, समाज कल्याण कार्यालय, आयटीआय चौक, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे होणार आहे.
लोकसंघ : सोशल एज्युकेशन मूव्हमेंट, माळी समाज संघटना, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, आदिवासी विकास युवा परिषद आणि मराठा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘शिक्षण । संधी । मार्गदर्शन । सामाजिक सहभाग’ या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या संवादातून गडचिरोलीतील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाटचालीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!