गडचिरोलीत तान्हा पोळ्याचा उत्साह; रेड्डी गोडाऊन चौकासह आशिर्वाद नगरला माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची भेट.

रेड्डी गोडाऊन चौक येथे बालगोपालांना पारितोषिकांचे वितरण; विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत दिल्या तान्हा पोळा सणाच्या शुभेच्छा.
गडचिरोली, दि. ११ सप्टेंबर २०२६ :
महाराष्ट्राच्या समृद्ध कृषी व सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेला तान्हा पोळा उत्सव गडचिरोली शहरातील रेड्डी गोडाऊन चौकात मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
शहरातील रेड्डी गोडाऊन चौक येथे ‘हर हर महादेव तान्हा पोळा मंडळा’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तान्हा पोळा उत्सवाला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.
यावेळी डॉ. अशोकजी नेते यांनी चिमुकल्या बालगोपालांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढविला. मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट नंदीबैल सजावट व आकर्षक वेशभूषा स्पर्धेतील विजेत्या बालकांना त्यांच्या हस्ते रोख पारितोषिके व बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
आकर्षक नंदीबैल सजावट आणि बालकांचा उत्साह
तान्हा पोळ्यानिमित्त लहान मुलांनी पारंपरिक पद्धतीने नटवलेले नंदीबैल, रंगीबेरंगी सजावट आणि विविध आकर्षक वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. बालकांच्या उत्साहाने आणि आनंदाने संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमात सहभागी बालगोपालांना खाऊचे वाटप तसेच शालेय साहित्य किटचे वितरण करण्यात आले. बक्षिसे मिळाल्यानंतर बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला. उपस्थित नागरिकांनी मंडळाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
आशिर्वाद नगर येथेही डॉ. अशोकजी नेते यांची सदिच्छा भेट
तान्हा पोळा उत्सवाच्या निमित्ताने डॉ. अशोकजी नेते यांनी राधे बिल्डिंगजवळील आशिर्वाद नगर येथील तान्हा पोळा उत्सवालाही प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी नंदीबैल पूजन व तान्हा पोळा उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
रेड्डी गोडाऊन चौक व आशिर्वाद नगर येथील नागरिक, आयोजक तसेच चिमुकल्या बालगोपालांशी संवाद साधत त्यांनी सर्वांना तान्हा पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. शहरातील विविध भागांत तान्हा पोळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांना भेट देऊन नागरिकांच्या आनंदात सहभागी झाले.
यावेळी नगराध्यक्षा अँड. प्रणोती सागर निंबोडकर, न.प. सभापती सीमा कन्नमवार, सामाजिक नेते अरुणजी निंबोरकर, नंदुभाऊ कुमरे, प्रकाश निकुरे, अविनाश पाल, निलेश बोमनवार, मनीष भुसकुटे, शेखर साळवे, राजुभाऊ मल्लेलवार, राजूभाऊ बार, सोनू ब्राह्मणवाडे, विष्णूभाऊ तसेच आशिर्वाद नगर येथील संजयजी बारापात्रे, मंगेशभाऊ रणदिवे, रविभाऊ मेश्राम, प्रवीण रक्षमवार यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मोठ्या संख्येने बालगोपाल उपस्थित होते.
परंपरा, संस्कृती आणि बालमनाचा आनंद यांचा सुंदर संगम असलेल्या तान्हा पोळ्यामुळे गडचिरोली शहरातील वातावरण आनंदमय झाले होते.
