गडचिरोलीतील शाळांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : शिक्षणमंत्री दादाजी भुसे.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत विविध शाळांना भेट; गुणवंत विद्यार्थी व उपक्रमशील शिक्षकांचा गौरव

गडचिरोली, दि. १० सप्टेंबर : गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासाला शासनाचे प्राधान्य असून, शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शिक्षणमंत्री भुसे यांनी रामनगर, गोगाव, बोदली यांसह विविध शाळांना प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वर्गखोल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, ई-लॅब, संगणक प्रयोगशाळा आणि वाचनालयाची पाहणी केली. आवश्यक सुधारणा व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
लोकसहभाग आणि CSRमधून शाळांचा कायापालट
शाळांच्या विकासासाठी लोकसहभागासोबतच CSR निधी, जिल्हा नियोजन समिती तसेच मानव विकास मिशनच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्याचे भुसे यांनी सांगितले. जीर्ण व धोकादायक शालेय इमारतींचे तातडीने निर्लेखन करून नवीन इमारतींसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
रिक्त शिक्षक पदे लवकरच भरणार
राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून, रिक्त पदांवर लवकरच शिक्षक रुजू होतील, अशी माहिती भुसे यांनी दिली. केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा प्रश्नही मार्गी लावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विविध परीक्षा, विज्ञान, क्रीडा, स्काऊट-गाईड तसेच शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि आदर्श व उपक्रमशील शिक्षकांचा शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
‘गुणवत्तेसोबत संस्कारही महत्त्वाचे’
“विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच त्यांच्यात राष्ट्रभक्ती, संस्कार आणि मूल्यांची रुजवणूक करणे ही काळाची गरज आहे,” असे भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!