सुपीक शेतीच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा एल्गार; येनापूर-जयरामपूरच्या १३ गावांत एमआयडीसीविरोधात सर्वपक्षीय एकजूट.
Oplus_131072

झुडपी जंगल किंवा पडीक जमिनीवर उद्योग उभारा; सुपीक जमीन अधिग्रहित करू नका – प्रणय खुणे
येनापूर, दि. ९ सप्टेंबर २०२६ : चामोर्शी तालुक्यातील येनापूर-जयरामपूर परिसरातील १३ गावांमध्ये प्रस्तावित एमआयडीसीसाठी होणाऱ्या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) चित्तरंजनपूर (येनापूर) येथे सर्वपक्षीय सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. सभेला शेकडो शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या लढ्याला पाठिंबा जाहीर केला. “येनापूर-जयरामपूर परिसरातील १३ गावांतील सुपीक शेतजमिनी एमआयडीसीसाठी संपादित करू देणार नाही. शासनाला जमीन अधिग्रहित करायची असेल तर जिल्ह्यातील झुडपी जंगल क्षेत्राचा विचार करावा; मात्र पिढ्यानपिढ्या कसलेल्या शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी सरकारला अधिग्रहित करू देणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
उद्योग आणि विकासाला विरोध नाही, मात्र शेती उद्ध्वस्त करून होणारा विकास मान्य नाही, अशी भूमिका उपस्थितांनी मांडली. शासनाने एमआयडीसी अथवा अन्य औद्योगिक प्रकल्पांसाठी सुपीक शेतीऐवजी पडीक, पर्यायी किंवा उपलब्ध शासकीय जमिनींचा वापर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता असून कोणत्याही आमिषाला बळी न पडता एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन प्रणय खुणे यांनी केले. “पिढ्यानपिढ्या कसलेली जमीन वाचविण्यासाठीचा हा लढा केवळ काही गावांचा नसून शेतकरी हिताचा लढा आहे. त्यामुळे सर्वांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे संघर्ष करावा,” असेही त्यांनी सांगितले.
सभेला प्रकाश पोहरे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पदमशाली, जिल्हा महाग्रामसभेचे नितीन पदा, राहुल सोनटक्के, निखिल भारत बंगाली समाज संघटनेचे दीपक हलदार, शिवसेना पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे अमोल गण्यारपवार, काँग्रेसचे मनोहर पाटील पोरेटी, पंकज गुड्डेवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख पवन गेडाम, मनसे जिल्हाप्रमुख राजेंद्र साळवे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. महेश कोपुलवार, महेश मारकवार, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष रमेश मडावी, सीटूचे सचिव देवराव चवळे, नाना पसपुलवार आदी उपस्थित होते.
एमआयडीसीसाठी सुपीक जमिनीच्या प्रस्तावित भूसंपादनाचा मुद्दा आता येनापूर-जयरामपूर परिसरात चांगलाच तापला असून, शेतकऱ्यांच्या पुढील आंदोलनाची दिशा काय असेल याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
