यशोधरा विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; NMMS परीक्षेत गणेश दुधबावरेचे जिल्ह्यात टॉप-१० मध्ये यश, शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते गौरव.
चामोर्शी : येथील यशोधरा विद्यालय चामोर्शीचा विद्यार्थी गणेश मनोज दुधबावरे याने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्यातील टॉप -१० विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन गडचिरोलीच्या सभागृहात विशेष सत्कार करण्यात आला.

गणेशच्या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य शाम रामटेके यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली गुणवत्ता, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या बळावर मोठे यश संपादन करता येते, हे गणेशने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.
यशोधरा विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसोबतच विविध स्पर्धा व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी सातत्याने मार्गदर्शन केले असून गणेशचे यश हे विद्यालयासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
विद्यालयाचे प्राचार्य शाम रामटेके म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन, संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते निश्चितच मोठी झेप घेऊ शकतात. गणेशचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल.”
गणेशच्या या यशाबद्दल राहुल लोक विकास मंडळाच्या अध्यक्षा कौशल्या सहारे , सचिव विवेक सहारे , से. नि. शिक्षणाधिकारी माणिक साखरे व मंडळाचे पदाधिकारी तथा विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व पालकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

