NMMS परीक्षेत वैष्णवी राऊत जिल्ह्यात प्रथम; शिवाजी हायस्कूल, चामोर्शीच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा,शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार.
Oplus_131072
इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत दरवर्षी मिळणार १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती; शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार
गडचिरोली/चामोर्शी : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेत शिवाजी हायस्कूल, चामोर्शी येथील गुणवंत विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी जानकीराम राऊत हिने सत्र २०२५-२६ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत विद्यालयासह चामोर्शीच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक वाढविला आहे.
वैष्णवीच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन तिचा विशेष सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात अव्वल ठरण्याचा मान मिळविल्याने वैष्णवीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
NMMS परीक्षेतील यशामुळे वैष्णवीला शासनाच्या वतीने इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत दरवर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. मेहनत, गुणवत्ता आणि जिद्दीच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे तिने इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
वैष्णवीच्या या उज्ज्वल यशाबद्दल शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री, मंडळाचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य धनेंद्र चौधरी, उपप्राचार्य शाम भरें, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी वैष्णवीचे पालक जानकीराम राऊत उपस्थित होते. मुलीने जिल्हास्तरावर मिळविलेल्या यशामुळे पालकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
वैष्णवीचा जिल्ह्यातील प्रथम क्रमांक हा केवळ तिच्या वैयक्तिक यशाचा गौरव नसून शिवाजी हायस्कूल, चामोर्शीच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करणारा मानाचा अध्याय ठरला आहे.
