लोकसहभागातून उभारलेली पळसगावची ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका प्रेरणादायी.
विद्यार्थ्यांनी सुविधेचा पुरेपूर लाभ घेत करिअर घडवावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
गडचिरोली, दि. ८ सप्टेंबर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका हा अत्यंत प्रेरणादायी उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले. या अभ्यासिकेचे लोकार्पण जिल्हाधिकारी पंडा यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकार्पण सोहळ्यानिमित्त गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे ग्रामस्थ व युवकांना शुभेच्छा दिल्या. लोकसहभागातून उभारलेल्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी वडसाचे उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान, आरमोरीच्या तहसीलदार उषा चौधरी, गटविकास अधिकारी मंगेश आरेवार, नायब तहसीलदार दोनाडकर, सहायक गटविकास अधिकारी कुर्झेकर यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा
जिल्हाधिकारी पंडा यांनी अभ्यासिकेची पाहणी करून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले.
लोकसहभागातून निर्माण होणाऱ्या अशा शैक्षणिक सुविधा गावाच्या विकासाला चालना देतात. तसेच इतर गावांसाठीही त्या प्रेरणादायी ठरतात, असे जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले.
अभ्यासिका ही केवळ अभ्यासाची जागा नसून विद्यार्थ्यांमध्ये नियमित अभ्यासाची सवय, शिस्त आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणारे केंद्र आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा पुरेपूर उपयोग करून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण तसेच विविध क्षेत्रांतील करिअरसाठी स्वतःला सक्षम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता
ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता आहे. त्यांना योग्य शैक्षणिक वातावरण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा मिळाल्यास ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, असा विश्वास जिल्हाधिकारी पंडा यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात निर्माण होत असलेल्या विकास व रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी युवकांनी शिक्षणासोबतच कौशल्यविकासावरही भर द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

