मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांची माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी घेतली भेट.
मुंबई : भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुंबई येथील मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांची भेट घेऊन राज्यातील आदिवासी समाजाच्या विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांकडून विविध मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन, आदिवासी समाजासमोरील बोगस आदिवासी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रांच्या समस्या, तसेच आदिवासी समाजाला संविधानाने दिलेले संवैधानिक हक्क व त्यांची प्रभावी अंमलबजावणी या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा, तसेच बोगस आदिवासी प्रमाणपत्रांमुळे खऱ्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांवर व उमेदवारांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी प्रभावी कार्यवाही करावी, अशी भूमिका माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मांडली.
तसेच आदिवासी समाजाच्या संविधानिक अधिकारांचे संरक्षण, शासनाच्या आदिवासी विकास योजनांचा प्रभावी लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
मंत्री प्रा. अशोक उईके यांनी संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा करून आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आश्वस्त केले.
यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस गणेश इंगळे, प्रदेश उपाध्यक्ष उमेश पवार आदी उपस्थित होते.
