एटापल्लीतील चार शाळा होणार ‘हायटेक’; जिल्हा खनिज निधीतून ‘मॉडेल शाळा’ म्हणून होणार कायापालट.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

गडचिरोली:
दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणेच आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण स्थानिक पातळीवर मिळावे, यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एटापल्ली तालुक्यातील चार शाळांचे रूपांतर आता अत्याधुनिक अशा ‘मॉडेल शाळां’मध्ये करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी ४ सप्टेंबर रोजी केलेल्या तालुका दौऱ्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यासाठी लागणारा सर्व निधी ‘जिल्हा खनिज प्रतिष्ठान’ (DMF) मधून उपलब्ध करून दिला जाणार आहे.
​या उपक्रमांतर्गत हालेवारा व तोडसा येथील दोन आश्रमशाळांचे रूपांतर ‘मॉडेल आश्रमशाळां’मध्ये, तर बुर्गी व पैमा येथील दोन जिल्हा परिषद शाळांचा विकास ‘मॉडेल शाळा’ म्हणून केला जाईल.
​विद्यार्थ्यांना मिळणार या आधुनिक सुविधा:
​अत्याधुनिक पायाभूत सुविधा: स्मार्ट वर्गखोल्या, डिजिटल लायब्ररी, प्रशस्त डायनिंग हॉल आणि बहुउद्देशीय सभागृह.
​क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास: सुसज्ज क्रीडांगणे, वाचनालये आणि तंत्रज्ञानाधारित सहशालेय उपक्रम.
​शाश्वत व पर्यावरणपूरक विकास: सौरऊर्जा प्रणाली (Solar Power) आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा.
​दर्जेदार निवासी व्यवस्था: आश्रमशाळांमधील वसतिगृहांचे आधुनिकीकरण.
​शहरी आणि दुर्गम भागातील शैक्षणिक सुविधांमधील दरी कमी करणे, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती टिकवणे आणि शाळांमधील पटसंख्या वाढवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक पातळीवरच शहरांच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण आणि उत्तम निवासी सुविधा उपलब्ध होणार असल्याने हा प्रकल्प संपूर्ण जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!