शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवून शाळांचा सर्वांगीण विकास साधा शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांचे निर्देश.
‘PGI’मध्ये गडचिरोलीची ३४ वरून ९ व्या स्थानी झेप

गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण विभागाने परिणामाभिमुख पद्धतीने काम करावे. शाळांचा भौतिक तसेच शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवून सर्वांगीण विकास साधावा, असे निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.
गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी विविध शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्याने ‘PGI’मध्ये ३४ व्या स्थानावरून थेट ९ व्या स्थानी झेप घेतल्याबद्दल शिक्षण यंत्रणेचे विशेष कौतुक करण्यात आले.
आयुक्त सिंह यांनी जिल्ह्यातील शाळांना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमित भेटी देण्याच्या सूचना केल्या. प्रत्यक्ष शाळांना भेटी न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून विद्यार्थी गळती शून्यावर आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
शाळांमधील वर्गखोल्या, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि गणितीय विचारसरणी विकसित करण्यासाठी ‘सायन्स सोमवार’ आणि ‘गणित गुरुवार’ हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचेही त्यांनी सांगितले.
पेसा क्षेत्रातील युवकांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग
पेसा क्षेत्रातील स्थानिक D.Ed. व B.Ed. पात्र युवकांना TET-TAIT परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग उपलब्ध करून देण्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे स्थानिक पात्र उमेदवारांना शिक्षक भरतीच्या संधींसाठी आवश्यक मार्गदर्शन व समुपदेशन मिळणार आहे.
वाहतुकीअभावी विद्यार्थिनीचे शिक्षण थांबू नये
अतिदुर्गम भागातील एकाही विद्यार्थिनीचे शिक्षण केवळ वाहतुकीच्या सुविधेअभावी थांबू नये, यासाठी आवश्यकतेनुसार पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
यासोबतच विद्यार्थ्यांची आधार पडताळणी, MBU आणि APAAR ID संदर्भातील प्रलंबित कामे महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्यासाठी प्रशासन, अधिकारी, शिक्षक आणि सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक उपक्रमाचा परिणाम प्रत्यक्ष दिसला पाहिजे, असे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी स्पष्ट केले.

