गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या २३ रुग्णांना मोठा दिलासा; खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या पुढाकारातून ५० लाखांहून अधिकांचे अर्थसहाय्य.
Oplus_131072
PMNRFच्या माध्यमातून २३ गरजू रुग्णांना ५० लाखांहून अधिक अर्थसहाय्य
कर्करोग, किडनी ट्रान्सप्लांटसह गंभीर आजारांवरील उपचारांसाठी खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा पाठपुरावा
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधी (PMNRF)च्या माध्यमातून मोठा आधार मिळाला आहे. खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी खासदारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर १ जून २०२४ पासून आतापर्यंत सुमारे २३ गरजू रुग्णांना उपचारासाठी ५० लाखांहून अधिक रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे.
कर्करोग, किडनी ट्रान्सप्लांट तसेच अन्य गंभीर आजारांवरील उपचारांचा खर्च मोठा असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसमोर उपचार सुरू ठेवण्याचे आव्हान निर्माण होते. अशा परिस्थितीत शासनाच्या आरोग्यविषयक योजनांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी खासदार डॉ. किरसान यांच्या कार्यालयाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
कागदपत्रांपासून निधी मंजुरीपर्यंत पाठपुरावा
रुग्णांच्या कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीची मागणी प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय अहवाल, आवश्यक कागदपत्रे, उपचाराचा अंदाजित खर्च आणि इतर आवश्यक माहिती संकलित करून संबंधित प्रकरणे प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीसाठी पाठविण्यात येतात. त्यानंतर निधी मंजुरीसाठी आवश्यक पाठपुरावा व मार्गदर्शन केले जाते.
या प्रक्रियेतून आतापर्यंत जवळपास २३ रुग्णांना ५० लाखांहून अधिक रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले आहे. गंभीर आजाराच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे संबंधित रुग्णांच्या कुटुंबीयांना उपचाराचा आर्थिक भार कमी करण्यास मदत झाली आहे.
आरोग्याच्या प्रश्नांनाही प्राधान्य
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचा मोठा भौगोलिक विस्तार आणि दुर्गम भाग लक्षात घेता आरोग्यसेवा व उपचारांचा खर्च हा अनेक कुटुंबांसाठी गंभीर प्रश्न ठरतो. त्यामुळे विकासकामांसोबतच गरजू नागरिकांना आरोग्यविषयक योजनांचा लाभ मिळवून देण्यावरही भर दिला जात असल्याचे खासदार डॉ. किरसान यांनी म्हटले आहे.
“मतदारसंघातील कोणताही गरजू रुग्ण केवळ आर्थिक परिस्थितीमुळे उपचारापासून वंचित राहू नये, हा आपला प्रयत्न आहे. गरजू रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळवून देण्यासाठी यापुढेही पाठपुरावा सुरू राहील,” असे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सांगितले.
महागड्या उपचारांच्या काळात २३ गरजू रुग्णांना ५० लाखांहून अधिक रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी केलेला पाठपुरावा संबंधित कुटुंबांसाठी दिलासादायक ठरला आहे.
