चोरीला गेलेले ७ मोबाईल पोलिसांनी हस्तगत करत मूळ मालकाला परत ; चामोर्शी पोलिसांची उत्तम कामगिरी.
चामोर्शी : मागील काही दिवसांत चामोर्शी शहर व परिसरातून नागरिकांचे महागडे अँड्रॉईड मोबाईल चोरी व गहाळ झाल्याच्या तक्रारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. या तक्रारींची गंभीर दखल घेत चामोर्शी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि CEIR पोर्टलच्या सहाय्याने उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ७ मोबाईल हस्तगत केले आहेत. एकूण २ लाख ४० हजार रुपये किमतीचे हे मोबाईल आज दिनांक ८ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात मूळ मालकांना परत करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून चामोर्शी पोलीस ठाणे हद्दीत प्रवासादरम्यान, बाजारात, तसेच शेतात काम करत असताना मोबाईल हरवणे आणि चोरी होण्याच्या घटना घडल्या होत्या. यासंदर्भात नागरिकांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या.
या सर्व तक्रारींचा एकत्रित तपास करण्याचे आदेश गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश साहेब यांनी दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गडचिरोली उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत हिरडे यांच्या सल्ल्याने चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. महादेव ढाकणे परी उप नि ललिता सातव यांनी एक विशेष पथक तयार केले.
या पथकात पोलीस अंमलदार भावेश वरगंटीवार, धनंजय मेश्राम यांचा समावेश होता. या पथकाने हरवलेल्या मोबाईलचे IMEI नंबर केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी म्हणजेच CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर टाकून त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जात असलेले हे १५ मोबाईल शोधून काढण्यात पथकाला यश आले.
आज चामोर्शी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक उप नि ललिता सातव यांच्या हस्ते आणि पोलीस उपनिरीक्षक व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व ७ तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. अनेक दिवसांपासून हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. यावेळी नागरिकांनी चामोर्शी पोलिसांचे आभार मानले.
सर्वसामान्य नागरिकांचे हरवलेले मोबाईल हे CEIR पोर्टलमुळे लवकर मिळत असून, नागरिकांनी आपला मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार देऊन CEIR पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे उ प नि ललिता सातव यांनी यावेळी केले आहे.
चामोर्शी पोलिसांच्या या जलद आणि कौतुकास्पद कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
