गरीबांच्या झोपड्यांवर नाही, त्यांच्या स्वप्नांवर अतिक्रमण करू नका — एमआयएम जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांचा प्रशासनाला इशारा .
वर्धा | प्रतिनिधी
वर्धा शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान गरीब, गरजू नागरिक, हातगाडीधारक, फेरीवाले आणि छोटे दुकानदार यांच्या रोजीरोटीचा विचार करण्यात यावा, अशी मागणी एमआयएमचे वर्धा जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांनी प्रशासनाकडे केली आहे.
शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न हा केवळ रस्ते किंवा सार्वजनिक जागेपुरता मर्यादित नसून, त्यामागे अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न जोडलेला आहे. हातगाडी, फुटपाथवरील व्यवसाय किंवा छोटे दुकान चालवून अनेक कुटुंबे आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे अचानक कारवाई झाल्यास संबंधित कुटुंबांसमोर आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याचे खान यांनी म्हटले आहे.
अतिक्रमण हटविण्याची कारवाई कायद्याच्या चौकटीत आणि सर्वांसाठी समान पद्धतीने झाली पाहिजे. गरीब व छोट्या व्यावसायिकांवरच कारवाई करून मोठ्या किंवा प्रभावशाली व्यक्तींना वेगळा न्याय दिला जाऊ नये. प्रशासनाने कारवाई करताना पारदर्शकता आणि भेदभावमुक्त धोरण अवलंबावे, अशी मागणीही त्यांनी केली.
कारवाईपूर्वी संबंधित नागरिकांना योग्य ती पूर्वसूचना देण्यात यावी. तसेच त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून शक्य असल्यास पर्यायी व्यवसायाची जागा किंवा पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात यावी, असे आसिफ खान यांनी सांगितले.
“शहराचा विकास आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणे आवश्यक आहे. मात्र विकासाच्या नावाखाली गरीबांच्या हक्कांवर अन्याय होता कामा नये. प्रशासनाने गरीब नागरिकांना शत्रू न मानता संवादातून तोडगा काढावा,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“गरीबांच्या झोपड्यांवर नाही, त्यांच्या स्वप्नांवर अतिक्रमण करू नका. गरीबांचा हक्क आणि रोजीरोटी वाचवा. कायद्याच्या चौकटीत कारवाई करा; मात्र अन्यायकारक आणि एकतर्फी कारवाई आम्ही सहन करणार नाही,” असा इशारा एमआयएमचे वर्धा जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांनी दिला.
गरीब, कष्टकरी, छोटे दुकानदार आणि सामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी एमआयएम वर्धा जिल्हा सातत्याने आवाज उठवत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
