गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे; पोलीस प्रशासनाचे आवाहन.
Oplus_131072

चामोर्शी |
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चामोर्शी येथे पोलीस स्टेशन चामोर्शी व गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सव मंडळ संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी बालाजी सभागृह, चामोर्शी येथे झालेल्या या बैठकीत गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याबाबत मंडळांना विविध सूचना देण्यात आल्या.
बैठकीला पोलीस उपअधीक्षक अनिकेत हिरडे, उपअभियंता देवगडे आणि पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चामोर्शी शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, डीजे चालक तसेच संबंधित सहकारी उपस्थित होते.
पोलीस उपअधीक्षक अनिकेत हिरडे यांनी गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाच्या काळात विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. कोणत्याही मंडळाच्या परिसरात दारू, जुगार अथवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे प्रकार होणार नाहीत, याची मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. उत्सवाला गालबोट लागेल अशी कोणतीही घटना घडू नये, यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
गणेशमूर्तीची स्थापना व मिरवणुकीच्या मार्गाबाबतही मंडळांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. गणपतीची मूर्ती आणण्यापूर्वी तिची उंची व लांबी तसेच संबंधित रस्ते व गल्लींची रुंदी याचा विचार करावा. मार्गावरील विद्युत तारांचा अडथळा होणार नाही, याची विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
तीन ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था
गणेश विसर्जनासाठी शहर परिसरातील गावातील तलाव, आष्टी रोडवरील कालवा आणि शासकीय तलाव अशा ठिकाणांचा विचार करण्यात आला आहे. विसर्जनाच्या वेळी पोलीस प्रशासन, नगरपंचायत कर्मचारी व संबंधित यंत्रणा उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे.
डीजेचा आवाज मर्यादित ठेवण्याचे आवाहन
गणेशोत्सवातील ध्वनिक्षेपक व डीजेच्या आवाजाबाबतही प्रशासनाने मंडळांना सूचना दिल्या. डीजेचा आवाज निर्धारित मर्यादेत ठेवावा आणि नागरिकांना त्रास होईल अशा प्रकारे मोठ्या आवाजात संगीत वाजवू नये. उत्सवादरम्यान ध्वनीप्रदूषणाबाबत तक्रारी येणार नाहीत, याची मंडळांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, महावितरणच्या वीज जोडणीसंदर्भात उपअभियंता देवगडे यांनी गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन केले. दहा दिवसांच्या उत्सवासाठी आवश्यक असलेले नवीन वीज मीटर अधिकृत पद्धतीने अर्ज करून घ्यावे, असे त्यांनी मंडळांना आवाहन केले.
बैठकीच्या शेवटी पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी उपस्थित गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व नागरिकांचे आभार मानले. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी बैठकीत देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
