वाघोलीतील खून प्रकरणातील मृताची ओळख पटली; तपासासाठी पोलिसांची पथके रवाना.
Oplus_131072
चामोर्शी | प्रतिनिधी
चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली शिवारात ७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारास झालेल्या खून प्रकरणातील मृताची अखेर ओळख पटली आहे. मृताचे नाव नंदकिशोर मोतीलाल मिश्रा उर्फ बंटी (वय ३४), रा. तेली मोहल्ला, वॉर्ड क्र. ५, श्रीराम मंदिराजवळ, मुल, ता. मुल, जि. चंद्रपूर असे असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
वाघोली शिवारात सोमवारी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मृताची ओळख पटत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. दरम्यान, मंगळवारी मृताचे नातेवाईक चामोर्शी येथे दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर मृताचे नाव व पत्ता स्पष्ट झाला.
मृताची ओळख पटल्याने आता या खून प्रकरणाच्या तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. मात्र नंदकिशोर मिश्रा यांचा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी चामोर्शी पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके तयार केली असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास सुरू केला आहे. मृताच्या नातेवाईकांसह काही संशयित व्यक्तींकडेही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
खून प्रकरणातील आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक तपासासह विविध बाबींची पडताळणी केली जात असून, या तपासातून लवकरच महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
— महादेव ढाकणे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे चामोर्शी
